जालना लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपचे रावसाहेब दानवे यांना मताधिक्य मिळाले. बदनापूरमध्ये त्यांना ५८.३० टक्के मते पडली असून अन्य पाच विधानसभा मतदारसंघातील एकूण मतांपैकी ५४ ते ५५ टक्क्य़ांच्या दरम्यान मते मिळाली आहेत. जालना ५४.५७, भोकरदन ५४, सिल्लोड ५४.२४, पैठण ५४.४१, फुलंब्री ५४.९८ टक्के या प्रमाणे दानवे यांना मते पडली आहेत. बदनापूर वगळता अन्य पाचही विधानसभा मतदारसंघातील त्यांची मते टक्केवारीच्या बाबतीत जवळपास सारखीच म्हणजे ५४ ते ५५ टक्क्य़ांच्या दरम्यान आहेत.
काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांच्यापेक्षा विधानसभा मतदारसंघनिहाय दानवे यांचे मताधिक्य पुढीलप्रमाणे आहे- जालना (२९,२९९), बदनापूर (४६,९३१), भोकरदन (२८,२३८), सिल्लोड (२९,७१७), फुलंब्री (३३,२५९) आणि पैठण (३८,८९२). मागील वेळेस (२००९) झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारास जवळपास १५ हजार मतांचे मताधिक्य होते आणि या वेळेसही तसेच होईल, असा अनेकांचा अंदाज या वेळेस खोटा ठरला. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जालना विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी अधिक अनुकूल झाल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते. परंतु दानवे यांना पडलेल्या मतांमुळे हा समज चुकीचा ठरला आहे. वास्तविक पाहता मतदारसंघांची पुनर्रचना होण्यापूर्वी आणि त्यानंतरही जालना विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला नेहमीच अनुकूल राहिलेला नाही. गेल्या २५ वर्षांत (१९८९ ते २०१४) झालेल्या लोकसभेच्या आठपैकी पाच निवडणुकांत जालना विधानसभा क्षेत्रात भाजपला मताधिक्य मिळालेले आहे. १९८९, १९९६, १९९९, २००४ आणि २०१४ या पाच लोकसभा निवडणुकांत जालना विधानसभा क्षेत्रात भाजपला मताधिक्य राहिलेले आहे. १९९१ ते २००९ दरम्यानच्या सहाही निवडणुकांत पैठण आणि फुलंब्री (पूर्वीचा औरंगाबाद पूर्व) विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीस मताधिक्य होते. या वेळेसही (२०१४) ते कायम आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे असूनही त्याचा उपयोग काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांच्या विजयासाठी होऊ शकला नाही. रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध विविध आरोपांची राळ आघाडीकडून उठविण्यात आली होती. त्यामुळे आक्रमक काँग्रेस आणि बचावात्मक भाजप असे स्वरूपही अनेकदा आले होते. परंतु काँग्रेसच्या प्रचारात दानवे विरुद्ध उठविण्यात आलेले आवाज नरेंद्र मोदींच्या लाटेच्या आवाजात विरून गेल्याचे निकालाने स्पष्ट झाले. दानवे आता सलग चौथ्या वेळेस लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यापूर्वी दहा वर्षे ते भोकरदन मतदारसंघांतून विधानसभा सदस्य राहिलेले आहेत.