सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ‘बेडा जंगम’ या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी पूर्ण झाली असून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्याच्यावतीने दाखल केलेले म्हणणे फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात येऊन भाजपालाही धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आता टपालाद्वारे निकाल पोहोच करणार आहे.

सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार तथा गौडगावच्या वीरशैव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या दोघा दिग्गजांना पराभूत केले होते. निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी लिंगायत समाजातील बेडा जंगम या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यास आक्षेप घेत विनायक कंदकुरे, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड व मिलिंद मुळे या तिघांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्राची पडताळणी होऊन तक्रारदारांच्या आक्षेपावर सुनावणी झाली.

या प्रकरणात सुरुवातीला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्यावतीने गौडगाव येथील जातीचा पुरावा दाखल केला असता तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर उस्मानबाद जिल्ह्य़ात उमरगा तालुक्यातील तडमोड गावात १९३४ साली डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्याचे वडील एका शेतक ऱ्याची जमीन कसत होते. त्यासंदर्भात महसुली पुराव्याचा दावा म्हणून बेडा जंगम या जातीचा पुरावा सांगणारी कागदपत्रे दाखल केली असता दक्षता समितीने त्याची तपासणी केली. त्यात तो पुरावा संशयास्पद आणि असमाधानकारक आढळून आला. त्यानंतर तिसऱ्यांदा डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजींच्यावतीने जातीचा पुरावा म्हणून १८७ पानांची कागदपत्रे दाखल केली असता त्यावरही सुनावणी झाली. तसेच त्याची दक्षता समितीमार्फत गृहचौकशी झाली असता त्यात जातीचा पुरावा आढळून आला नाही. शनिवारी दुपारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सूळ यांच्यासमोर झालेल्या सुनवणीअंती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्याचे म्हणणे फेटाळण्यात आले.

उच्च न्यायालयात जाणार
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्यावतीने यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्राच्या संदर्भात याचिका दाखल करताना संबंधित मूळ कागदपत्रे जोडली आहेत. त्यामुळे मूळ कागदपत्रे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करता आली नाहीत. दक्षता समितीने दिलेले तिन्ही अहवाल अविश्वसनीय आहेत. सध्याची जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तक्रारदारांच्या दबावाखाली काम करीत आहे. त्यामुळे नव्या समितीसमोर सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आम्ही पुरावे देऊन म्हणणे मांडण्यासाठी मुदतीचा अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. मात्र पडताळणी समितीने तो फेटाळल्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहोत.
-अॅ्ड. संतोष न्हावकर, डॉ. महास्वामीजींचे वकील

महास्वामीजींवर कारवाई व्हावी
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचे बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र अवैध असून भक्कम कायदेशीर पुरावा असलेली कागदपत्रे त्यांना वेळोवेळी संधी देऊनसुद्धा सादर करता आली नाहीत. यापूर्वी त्यांनी कोणत्या आधारे जात प्रमाणपत्र मिळविले, त्याची कोणतीही कागदपत्रे दाखल करता आली नाहीत. महसुली पुरावा म्हणून सादर केलेली कागदपत्रेही अस्सल पुरावा म्हणून सिद्ध करता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी.
-विनायक कंदकुरे, तक्रारदार