दिगंबर शिंदे

महापालिकेत सत्ता परिवर्तन घडविण्याचा निर्धार करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी फेरत भाजपने आपली सत्ता कायम राखली. त्यामुळे स्थानिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वल्गना हवेतच विरल्या आहेत.

भाजपने आयारामांच्या जीवावर बहुमत मिळवत सांगली महापालिकेची सत्ता हस्तगत केली. महापौरपदाची संधी देत असतानाच सव्वा वर्षांसाठीच हे पद देण्यात येत असल्याचे संगीता खोत यांना सांगण्यात आले होते. मात्र मुदत संपली तरी पायउतार होण्याची त्यांची तयारी नव्हती. राज्यात नवे सत्ता समीकरण आकाराला आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा परिणाम पदाधिकारी बदलावर होऊ नये याची दक्षता घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेळ येताच पदाधिकारी बदलाचे संकेत दिले. खोत यांनी राजीनामा देताच पक्षांतर्गत इच्छुकांच्या इच्छेलाही घुमारे फुटू लागले. महापौर पदासाठी तब्बल सात महिला इच्छुक होत्या. मात्र, निवडणुकीवेळी पक्षात येणाऱ्यांना दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी गीता सुतार यांना महापौरपदाची संधी देण्यात आली.

काँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर आणि राष्ट्रवादीचे गटनेते मनुद्दीन बागवान अखेपर्यंत आमचाच महापौर होणार, असे माध्यमांना सांगत होते. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. भाजपमधील आठ सदस्य बाहेर पडण्याचा तयारीत असतानाही त्यांना आपल्या गोटात वळवण्याची संधी त्यांनी गमावली. यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनीच पुढाकार घ्यावा, अशी त्यांची मानसिकता होती. मात्र पाटील यांनी महाविकास आघाडीवेळी सत्तेचा खेळ कसा चालतो, याचा चांगला अनुभव घेतला असल्याने त्यांनीही या सत्तांतरावेळी दूरूनच मदतीचे आश्वासन देत आघाडीच्या नेत्यांचा वकुब अजमावला.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ३५ सदस्यांचे संख्याबळ कायम ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरलो असून, यापुढील काळात नव्या पदाधिकाऱ्यांना विकासात्मक कामात सहकार्य करण्याची आघाडीची भूमिका कायम असेल. मात्र चुकीचा कारभार होत असेल तर ताकदीने विरोध केला जाईल.

– उत्तम साखळकर, विरोधी पक्ष नेते

महापालिकेत विविध विचारांचे लोक आहेत. त्या सर्वाना एकत्र ठेवून सत्ता कायम राखण्याचे आव्हान होते, ते सर्वाच्या सहकार्याने पार पडले. यात सर्वाचेच सहकार्य लाभले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची दूरदृष्टीची ही चुणूक आहे. नवीन पदाधिकारी आता शहराच्या विकास कामांना प्राधान्य देतील.

– शेखर इनामदार, नगरसेवक आणि प्रदेश उपाध्यक्ष भाजप.