नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज उमेदवार अशोक चव्हाण यांचा मोठय़ा फरकाने पराभव झाल्यानंतर शहराच्या शिवाजीनगर भागातील त्यांच्या ‘आनंद निलयम’ या प्रासादतुल्य बंगल्यावर दुपारनंतर अवकळा पसरली, तर भाजपचे विजयी उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगरातील ‘साई सुभाष’ निवासस्थानी विजयाचा जल्लोष सुरू झाला.

नांदेड  मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात, १८ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर प्रत्यक्ष निकालासाठी तब्बल ३६ दिवस प्रतीक्षा करावी लागली. मधल्या काळात काँग्रेससह भाजपकडून विजयाचे दावे-प्रतिदावे होत राहिले. मतदानानंतर ठिकठिकाणाहून मिळालेल्या एकंदर माहितीवरून खासदार चव्हाण आपल्या यशाबद्दल ठाम विश्वास बाळगून होते; पण गुरुवारी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून सुरू झालेली त्यांची पीछेहाट शेवटपर्यंत कायम राहिली.

मतमोजणीच्या निर्धारित तारखेच्या दोन दिवसआधी चव्हाण यांचे येथे आगमन झाले. मतमोजणीतील काँग्रेस प्रतिनिधींना त्यांनी आवश्यक त्या सूचनाही दिल्या होत्या. गुरुवारी सकाळी तयार होऊन ते आपल्या वरील निवासस्थानी थांबले होते. काही सहकारीही त्यांच्यासमवेत होते. दुसऱ्या बाजूला प्रताप पाटील चिखलीकर हेही आपल्या वसंतनगरातील निवासस्थानी बसून मतमोजणीच्या प्रत्येक फेरीची माहिती घेत होते. दुपारी तीननंतर चिखलीकरांच्या विजयाची शक्यता वाढत गेल्याने त्यांच्या निवासस्थानी समर्थक, कार्यकत्रे आणि हितचिंतकांची गर्दी वाढत गेली.

सकाळी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात टपाली मतदानाची मोजणी स्वतंत्रपणे करण्यात आली, त्यात चव्हाण यांना सर्वाधिक मते मिळाल्यामुळे मतदानयंत्रांवरील मोजणीतही हाच कल राहील, अशी काँग्रेसची अपेक्षा होती; पण भाजपचे चिखलीकर यांनी मोजणीच्या पहिल्या फेरीतच सहा हजार मतांची आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत आपली आघाडी कायम राखली.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मतमोजणीचा अर्धा टप्पा पूर्ण झाला तेव्हा चिखलीकरांची आघाडी २३ हजारांवर गेली होती.

पुढच्या टप्प्यात ही आघाडी हळूहळू कमी होत चव्हाण पुढे जातील अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती; पण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार प्रत्येक फेरीत १५ टक्के मतांचा हिस्सा कायम ठेवून होता. त्यामुळे चिखलीकरांच्या ४३ टक्के मतांचा हिस्सा मागे सारून चव्हाण ४०-४२ टक्के मतांच्या पुढे जात नाहीत, हे नंतर लक्षात आल्यावर ‘आनंद निलयम’मधील सकाळच्या पहिल्या सत्रातील उत्साह सायंकाळपूर्वीच मावळला.

कोण चिल्लर, कोण ठोक

नांदेडचा सातबारा माझ्याच नावावर आहे, असे म्हणणाऱ्यांना सातबारा कोणाचा हे जनतेने दाखवून दिले असून माझा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय असून काँग्रेसमुक्त महाराष्ट्र केल्याबद्दल मी अशोकरावांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विजयानंतर वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केली.  या वेळी खासदार चिखलीकर म्हणाले,की अशोकरावांनी मला चिल्लर म्हटले होते. ‘कोण चिल्लर व कोण ठोक’ हे जनेतेने दाखवून दिले आहे. माझ्यामागे पक्षाने पूर्ण पाठबळ लावले व विजयासाठी सर्वानी प्रयत्न केले आहेत, असे या वेळी ते म्हणाले.