बुलडाणा येथील नांदुरा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते ते भाषणासाठी उभे राहताच काही शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, जिगाव प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला मिळावा या मागण्याही या वेळी करण्यात आल्या. यानंतर सुमारे १० शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याआधीच ही सभा होण्या आधी दोन गटांमध्ये वाद झाल्याचीही बातमी समोर आली. सभेसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्या फेकून एकमेकांचा निषेध केला. या वादाचे कारण समजू शकले नाही मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा वाद टळला.

सभेआधीच झाला वाद

दुपारच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या गावात मुख्यमंत्र्यांची सभा होणार होती. या सभेआधीच दोन गटांमध्ये अचानक वाद झाला. या वादात लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने हा वाद शमला. त्यानंतर काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नांदुऱ्यात पोहचले असून सभाही सुरु झाल्याची बातमी समजते आहे. एबीपी माझाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ होणार होता. तसेच राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र याच कार्यक्रमाच्या आधी गोंधळ झाला आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. या सगळ्या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काँग्रेस आणि मनसे कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचीही माहिती समोर आली आहे.