|| दिगंबर शिंदे

प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी बाहुल्या अन् भानामती

सध्याच्या माध्यमक्रांतीच्या युगात निवडणुकांमध्ये ‘समाजमाध्यमां’वरील प्रचाराची चर्चा होत असतानाच काळाआड गेलेल्या काळ्या बाहुल्या आणि भानामतीचा वापरही निवडणुकीत होत असल्याचे सांगलीत दिसून येत आहे. मिरजेतील एका उमेदवाराने त्याच्या देवांचा कौल घेत करणी केल्याच्या संशयावरून अन्य उमेदवाराने हा ‘काळा हल्ला’ परतवून लावण्यासाठी वर्दळीच्या चौकात चक्क भलीमोठी काळी बाहुली टांगली आहे. निवडणुकीच्या प्रचारातील या काळ्या जादूच्या प्रयोगाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मिरज शहरातील ४, ५ आणि ६ या तिन्ही प्रभागांच्या मध्यावर ऐतिहासिक ‘लक्ष्मी मार्केट’ची इमारत आहे. साहजिकच प्रचारातील आवाहनासाठी सर्वाकडूनच वापरला जाणारा हा केंद्रबिंदू. यामुळे बहुतेक सर्वच उमेदवार आपली जाहिरातबाजी या चौकातून करत असतात. या अशा गजबजलेल्या ठिकाणीच काल एका उमेदवाराने आपल्या प्रतिमेस कुणाची ‘नजर’ लागू नये म्हणून चक्क मोठय़ा आकारातील काळी बाहुली बांधली आहे. सुमारे १० फूट उंचीवर बांधण्यात आलेली ही काळी बाहुली सध्या सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. या बाहुलीसोबत लिंबूदेखील अडकवलेले आहे.

याची अधिक माहिती घेता असे समजले की, या प्रभागातील लढतीतील अन्य एक उमेदवार नुकताच कोकणातून देवदर्शन घेऊन आलेला आहे. या वेळी त्याने आपल्या विजयाबरोबरच विरोधी उमेदवाराच्या पराभवासाठी कौल घेतल्याचे सांगण्यात येते. कोकणातून आपल्या देवाकरवी केलेली ही करणी, भानामती आपल्यावर उलटू नये यासाठी आता या प्रभागातील अन्य उमेदवाराने चक्क चौकातच ही भलीमोठी काळी बाहुली उभी केली आहे. आता कोकणातील तो ‘कौल’ भारी ठरतो की त्याला रोखणारी ही ‘काळी बाहुली’ याचे उत्तर ३ ऑगस्ट रोजी मतमोजणीतून समजेल. पण तोवर आधुनिक समाजमाध्यमांच्या युगात या ‘काळ्या जादू्’च्या युद्धाची जोरदार चर्चा सुरू आहे.