झेरॉक्सच्या दुकानात १५०० रुपयांत ई-पास

विरार : श्रावणातील विविध उत्सव व सणांच्या काळात कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असताना प्रवासासाठी ई-पासची अनिवार्यता आडवी येत आहे. त्यावर मात्रा म्हणून अनेकांनी शासकीय सोपस्कार पार न पाडता काळा बाजार करणाऱ्यांकडे खेट घालणे सुरू केले आहेत. नालासोपारा, वसई, विरारमध्ये चक्क झेरॉक्सच्या दुकानात पंधराशे रुपयांत हे ई-पास उपलब्ध होत आहेत.

गणेश उत्सवाची चाहूल लागताच मुंबई आणि उपनगरातून मोठय़ा प्रमाणात कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढू लागते. सध्या करोनाकाळात प्रवास करण्यासाठी शासकीय परवानगी घ्यावी लागत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून ई-पासची सुविधा केली आहे. पण काही नफेखोरांनी यात शक्कल लढवत चक्क ई-पासचा काळा बाजार चालवला आहे. नालासोपारा वसई-विरारमधील काही झेरॉक्सची दुकाने १५०० रुपये घेऊन केवळ पंधरा मिनिटांत ई-पास उपलब्ध करून देत आहेत. यामुळे शासनाची फसवणूक करून नागरिकांना लुबाडण्याचा गोरखधंदा वसईत फोफावत आहे.

गणेश उत्सवासाठी मोठय़ा प्रमाणात वसई-विरारमधून प्रवासी कोकणात जात असतात. पण त्यासाठी त्यांना आता ई-पासची आवश्यकता आहे. शासकीय संकेतस्थळावर नोंदणी करून हा पास मिळवता येतो. पण त्यासाठी ८ ते १० दिवस लागत असल्याने नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. मात्र शहरातील झेरॉक्सच्या दुकानात हे पास सहज उपलब्ध होत आहेत.

ही बाब उघडकीस आणली ती नालासोपारा येथे राहणारे महेंद्र कदम यांनी. त्यांना कोकणात कोलादपूर येथे जायचे होते. त्यांनी नियमाप्रमाणे १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर ई-पाससाठी अर्ज केला होता. पण आठ दिवस उलटले तरी त्यांना कोणताही प्रतिक्रिया मिळाली नाही. यामुळे ते हैराण झाले होते या वेळी त्यांना माहिती मिळाली की, नालासोपारा येथे गणेश झेरॉक्स येथे ई-पास मिळतो. त्या वेळी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पासची चौकशी केली असता त्यांना १५०० रुपये घेऊन केवळ १५ मिनिटांत पास मिळाला. हा पास त्यांना शासकीय परवानगी असल्याचे नमूद केले होते. यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी सांगितले की, आम्ही कुणालाही ई-पास देण्याची परवानगी दिली नाही आहे. या संदर्भात पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच असे कुठले प्रकार होत असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांच्या लक्षात आणून द्यावे त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल.