मोहन अटाळकर

कृषी विभागाचे अधिकारी युरियाचा मुबलक साठा असल्याचे छातीठोकपणे सांगत असले, तरी कृषी केंद्रांसमोरील रांगांनी युरियाच्या कृत्रिम टंचाईचे चित्र समोर आणले आहे. अमरावती विभागात सद्य:स्थितीत १६ हजार ८५२ मे. टन युरियाचा साठा उपलब्ध असला, तरी मागणी वाढल्याने काळाबाजार शिगेला पोहोचला आहे.

कृषी विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांमध्ये साधारणपणे १ लाख ९० हजार मे. टन युरियाची मागणी असते. १ एप्रिल ते २६ जुलै या कालावधीत ९५ हजार ३७२ मे. टन युरियाची विक्री झाली आहे. तरीही अजून शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी आहेच. रासायनिक खतांची विक्री ही इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे (पीओएस) करणे बंधनकारक आहे. युरियाची खरेदी करताना पीक पेरा क्षेत्र आणि आधार कार्ड सोबत बाळगावे लागते; पण जेव्हा प्रत्यक्ष शेतकरी जेव्हा खरेदीसाठी जातो, तेव्हा त्याला अनेक ठिकाणी रांगेत उभे राहूनही युरिया मिळत नाही.

मागणी वाढल्याने २६५ रुपयांची युरियाची गोणी अनेक ठिकाणी ३५० ते ३८० रुपयांना विकली जात आहे. संपूर्ण विभागात युरियाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. चढय़ा किमतीतही शेतकऱ्यांना किमान दोन गोण्या खरेदी करण्याचे बंधन केले जात आहे. युरियासोबतच दुकानदार देईल ते अन्य खत विकत घ्यावे लागते. ही विक्री होत असताना एवढय़ा किमतीची पावती कुठलाही दुकानदार देत नसल्याने कृषी यंत्रणांना पुरावा मिळत नाही. त्यामुळे ते टंचाई नाही, वाढीव दराने विक्री होत नसल्याचे सांगून मोकळे होत आहेत.

विभागात एकूण रासायनिक खतांच्या वापरात एकटय़ा युरियाचा वापर हा सुमारे ६० टक्के आहे.

टाळेबंदीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने तालुक्याच्या ठिकाणी येण्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शिवाय खतांसाठीही आर्थिक झळ सोसावी लागत आहे. करोनाच्या संकटकाळात खतांच्या टंचाईने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

युरियाचा अवाजवी वापर?

युरियाच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शियम, बोरॉन, तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन काही जिवाणूंच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. गांडुळांच्या संख्येवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ उत्पादनाकडे लक्ष न देता मातीचा कस पाहणेही योग्य ठरते, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

* यवतमाळ जिल्ह्य़ात आतापर्यंत सर्वाधिक ३१ हजार ७३५ मे. टन युरियाची विक्री झाली आहे. त्याखालोखाल बुलढाणा २७ हजार ८७७, अमरावती १६ हजार १३२, अकोला १२ हजार ९३६ आणि वाशिम जिल्ह्य़ात ६ हजार ६९२ मे. टन युरियाची विक्री झाली आहे.

* सध्या यवतमाळ जिल्ह्य़ात ४ हजार ९११ मे. टन, बुलढाणा जिल्ह्य़ात २ हजार ४७, अमरावती ४ हजार ८०९, अकोला ४ हजार १०९ आणि वाशिम जिल्ह्य़ात ९७६ मे. टन युरिया उपलब्ध आहे.

* अमरावती विभागात युरियाची मागणी १ लाख ८५ हजार मे. टन इतकी असताना आतापर्यंत १ लाख १२ हजार मे. टन युरिया उपलब्ध झाला आहे. कृषी विभागाने खतांचा संरक्षित साठा करून ठेवण्याचे ठरवले, त्यात विभागात १२ हजार ३०० मे. टन साठय़ाचे नियोजन होते.

* केंद्र सरकारचा खत विभाग हा खतपुरवठा निश्चित करीत असतो. पेरणीपूर्वी दिलेल्या अंदाजित आवश्यकतेनुसार खतपुरवठा केला जातो; पण यंदा युरियाची मागणी वाढल्याने कृषी विभागाचे नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत.