28 September 2020

News Flash

अनुदानित युरियाचा काळाबाजार

नागरिकांच्या तक्रारी; नियंत्रण ठेवण्यास शासकीय यंत्रणा अपयशी

नागरिकांच्या तक्रारी; नियंत्रण ठेवण्यास शासकीय यंत्रणा अपयशी

पालघर : परराज्य-जिल्ह्यातील अनुदानित युरिया खताचा काळाबाजार औद्योगिक परिसरातील काही कारखानदारांकडून मोठय़ा प्रमाणात होत आहे.  मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरली आहे.  काही वस्त्रोद्योग आणि रसायन कारखाने युरिया खत कच्चा माल म्हणून  उत्पादनासाठी वापरत  असल्याने  खताच्या गोण्या बदलून रसायनाच्या नावे  त्याचा काळाबाजार या  कारखान्यांकडून केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

राज्यातील इतर जिल्ह्यांतून किंवा परराज्यातून आलेले अनुदानित युरिया खताची रासायनिक पदार्थाच्या नावे वाहतूक केली जाते. वाहनांमध्ये असलेल्या युरिया खताच्या गोणी निर्जन ठिकाणी  शेती—बागायतीच्या ठिकाणी उलटून किंवा नव्या गोणींमध्ये पुनर्भरण करून त्याची औद्योगिक वसाहतीमध्ये वाहतूक केली जाते. कुठलाही माहिती नसलेल्या सफेद गोणीमधून युरियाची वाहतूक होत असल्याने असे वाहन पकडणे प्रशासकीय यंत्रणेला शक्य होत नाही.

एकीकडे परराज्यातून येणाऱ्या गुटख्यावर पोलिसांकडून नियमितपणे कारवाई होत असते, मात्र अशा प्रकारेच परराज्यातून येणाऱ्या अनुदानित युरियाची वाहतूक करणारी वाहने पकडण्यात पोलीस यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  शनिवार १ ऑगस्ट रोजी एका पत्रकाराने या प्रकाराबाबत स्टिंग ऑपरेशन करण्याच्या प्रयत्न केला.  वेंगणी येथील एका वाडीवर त्याने छापा टाकला. यावेळी वाडीत एक महिला होती. त्यावेळी छेडछाड झाल्याचा प्रकार घडला अशी तक्रार संबंधित पत्रकाराविरुद्ध त्या महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केली. तर पोलिसांनी या युरिया काळाबाजार प्रकरणी पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुशील चुरी यांच्या वाडीवर  रात्री उशिरा छापा टाकला. पोलिसांना त्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार नसल्याचे आढळून आले. हा प्रकार म्हणजे  मला व माझ्या पक्षाला पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप चुरी यांनी केला आहे.

पालघरचे पालकमंत्री व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या आदेशावरून हे छापे टाकण्याचे पोलीस पाहणीच्या वेळी सांगत होते, हे खरे असल्यास खताचा काळाबाजार रोखण्यासाठी पालकमंत्री यांनी निर्देशित केलेल्या सूचनांचे आपण स्वागत करतो असे सांगून परराज्यातून किंवा परजिल्ह्यांतून गैरमार्गाने येणारे युरिया खत हे ट्रक कंटेनरमधून येत असताना तसेच तपासणी नाक्यावरून ते जात असतानाही त्याच्या तपासणीबाबत  चुरी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

युरिया परराज्यातील?

खरिपामध्ये पालघर जिल्ह्यात १५ हजार मेट्रिक टन अनुदानित युरियाची मागणी आहे.  त्यापैकी १३ हजार मेट्रिक टन युरिया विविध केंद्रांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत वितरित झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशीनाथ तरकसे यांनी दिली. आरसीएफकडून जिल्ह्यात अधिकतर अनुदानित युरिया पुरवठा होत असल्याने त्या ठिकाणाहून निघणाऱ्या मालवाहू गाडय़ांवर कृषी विभागाचे लक्ष असते. तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठय़ा प्रमाणात रासायनिक पदार्थ येत असल्याने तेथे येणाऱ्या सर्व गाडय़ांवर देखरेख ठेवणे  शक्य  नसल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 1:46 am

Web Title: black marketing of subsidized urea zws 70
Next Stories
1 शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नभोवाणी, दूरचित्रवाणीचा आधार
2 गावी पाठवत नसल्याने युवतीची आत्महत्या
3 विदर्भात सिंचनासाठी निधीची चणचण!
Just Now!
X