नगराध्यक्षांची थेट निवडणूक घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि त्याचा भाजपला राजकीय फायदाही झाला. नगराध्यक्षांच्या थेट निवडीस वर्ष पूर्ण झाले असून काही ठिकाणी नगराध्यक्ष एका पक्षाचा तर नगरपालिकेत बहुमत अन्य पक्षांचे अशी स्थिती आहे. यामुळे वाद निर्माण झाले. त्यातून शह-काटशहाचे राजकारण सुरू असून शहर विकासाचा विचका होत असल्याचे चित्र दिसत आहे.

वाईत कुरघोडय़ांमुळे कोंडी

सातारा जिल्ह्य़ात वाई नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रतिभा शिंदे विजयी झाल्या, पण नगरपालिकेत बहुमत राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने प्रथमपासूनच वाद निर्माण झाले. अवघ्या एका मताने डॉ. शिंदे या विजयी झाल्या. पालिकेत भाजप महाआघाडीचे सहा तर राष्ट्रवादीचे १४ जण निवडून आले. राष्ट्रवादीने नगराध्यक्षांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू केला. या वादात नागरी प्रश्न तीव्र झाले. परस्परांवरील कुरघोडय़ांतच  नगराध्यक्ष आणि नगरसेवक अडकून पडले. नगराध्यक्ष ठेकेदारांची अडवणूक करतात अशी चर्चा सुरू झाली. त्यातच ९ जूनला शौचालयाच्या बांधकामांचे बिल देण्यासाठी ठेकेदाराकडून स्वतच्याच दवाखान्यात लाच स्वीकारताना नगराध्यक्षा डॉ. शिंदे आणि त्यांचे पती या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचखोर नगराध्यक्षांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी मागणी करीत राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली. दोन महिने विरोधकांचे आंदोलनच सुरू होते. नगराध्यक्षा भाजपच्या असल्याने शासकीय यंत्रणांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

आरोपमुक्त होईन!

नगराध्यक्ष म्हणून वर्षभरात चांगला अनुभव आला. शहरातील रखडलेली विविध कामे मार्गी लावण्यात यश आले. शासनाची मदत झाली. उपनगराध्यक्ष, प्रशासन आणि सर्व नगरसेवकांचे चांगले सहकार्य मिळाले. मधल्या काळात माझ्याविरोधात काही आरोप झाले. त्यातून नक्कीच बाहेर पडेन. – डॉ. प्रतिभा शिंदे, नगराध्यक्ष, वाई, थेट नगराध्यक्ष निवडणुकीची वर्षपूर्ती