शहरातील मुख्य रस्त्यावरील जुन्या कस्तुरबा रुग्णालयाच्या जागेत काळीपिवळी वाहनचालकांनी चक्क थांबा म्हणून वापर सुरू केला आहे. मात्र, दोन महिन्यांपासून हा प्रकार घडत असूनही प्रशासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहे.
दरवर्षी उन्हाळय़ात रस्त्यावरील वाहतुकीचा ताण मोठय़ा प्रमाणात वाढतो. रस्त्याची रुंदी कमी व वाहनांची अमर्याद संख्या, त्यात अपुरे पोलीसबळ, बेदरकार वाहन चालवणारे चालक यामुळे पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागते. दुचाकी, रिक्षा, टमटम, काळीपिवळी, खासगी वाहने मनमानी पद्धतीने चालवली जातात. ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक लोक विनापरवाना वाहन चालवतात. ९० टक्के दुचाकीधारकांनी वाहनाचा विमा उतरवलेला नाही. या बाबींकडे वाहतूक पोलीस डोळय़ावर पट्टी ओढून थांबत असल्याचे दिसून येते.
कस्तुरबा गांधी रुग्णालयाची वास्तू आता कुलूपबंद आहे. ही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जोडली आहे. जागा वापराविना पडून असल्याचे हेरून काळीपिवळी चालकांनी या जागेचा वापर चक्क थांब्यासाठी सुरू केला आहे. काळीपिवळी चालकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाहतूक पोलीस यासारख्या यंत्रणांनी न हटकल्यामुळे बिनदिक्कत जागेचा वापर थांब्यासारखा होत आहे. गांधी मार्केटच्या परिसरात काळीपिवळी वाहने थांबतात. रस्त्यावर कुठेही अन् केव्हाही वाहन थांबवण्याचा परवाना असल्यासारखी ही वाहने चालवली जातात. हीच बाब शहरातील रिक्षाचालकांबाबतही दिसून येते. कोणत्याही दोन चौकाच्या मध्ये भररस्त्यात प्रवासी घेण्यासाठी रिक्षा थांबवली जाते. त्याला त्याची चूक दाखवून देण्याचे धाडस कोणीही करीत नाही. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अपघाताचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. अपघातात कोणाच्या प्राणावर बेतल्यास तेवढय़ापुरती हळहळ व्यक्त होते व पुन्हा सगळे आपली जबाबदारी विसरून जातात. वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज लातूरकर व्यक्त करीत आहेत.