पथदीपांची १३ वर्षांपासून सुमारे तीन कोटी २० लाख रुपये थकबाकी न भरल्याने अखेर बुधवारी सायंकाळी भाग एक व दोनवरील सर्व ३९ ठिकाणच्या पथदीपांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला. त्यामुळे महामार्गासह शहरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले.
मागील महिन्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध भागातील वीजपुरवठाही महावितरणने थकबाकीमुळे खंडित केला होता. तीन महिन्यात दोन वेळा थकबाकी भरण्यासाठी नोटीस देऊनही पालिकेने रक्कम भरलेली नाही. त्यामुळे नाइलाजाने ही कारवाई करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. १९९९ पासून पालिकेने पथदीपांचे बिल न भरल्याने थकबाकीची रक्कम आता तीन कोटी २० लाख २९ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. महावितरणच्या नोटीसला, थकबाकी महिन्याभरात भरतो, असे उत्तर पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी देऊनही रक्कम भरलेली नाही.