आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्यासमोर तालुक्यामधील काँग्रेसची ताकद दाखविण्यासाठी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला खटाटोप त्यांच्याच अंगाशी आला. आदिवासींना ब्लँकेट, साडी व भांडय़ाचे वाटप होणार असल्याचा गवगवा करून त्यांनी तालुक्यातील सापगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी बांधवांची गर्दी खेचली. मात्र आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने देण्यात आलेली ब्लँकेट वाटपाच्या इष्टांकापेक्षा अधिक आदिवासी बांधव जन्मल्यामुळे सुमारे दीड ते दोन हजार आदिवासींची झोळी रिकामीच राहिल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ठाणे जिल्हा (ग्रा.) काँग्रेस सेवादल, शहापूर तालुका काँग्रेस सेवा दल आणि एन. के.टी. चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी विकास विभागातर्फे १० आदिवासी दाम्पत्यांना कन्यादान योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप व ७०० आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप तसेच एन. के.टी. चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साडय़ांचे वाटप राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश, ब्लँकेट व साडय़ांचे वाटप झाल्यानंतर राज्यमंत्री गावित, माजी खासदार दामु शिंगडा व आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी निघून गेले. त्यानंतर उपस्थित आदिवासींमध्ये आपल्याला ब्लँकेट, साडी व भांडी मिळणार की नाही याबाबत चलबिचल सुरू झाली. मात्र आदिवासी विभागाचा इष्टांक हा ठरलेला असल्याने उर्वरीत आदिवासींमध्ये संभ्रम निर्माण झाला. आपला रोजगार बुडवून या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या आवाळे, टेंभा, सावरोली, खैरेपाडा, खाडीचापाडा यांसह विविध वाडय़ापाडय़ातील आदिवासी बांधवांना रिक्त हातानेच परतावे लागल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
याबाबत आदिवासी विकास प्रकल्प विभागाशी संपर्क साधला असता १० दाम्पत्यांना धनादेश व ७०० जणांना ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांना सांगण्यात आले. मंत्रिमहोदयांच्या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांची गर्दी दिसावी यासाठी ब्लँकेट, साडय़ा, भांडी मिळणार असल्याचे सांगून आमची दिशाभुल केल्याचा आरोप यावेळी संतप्त आदिवासींनी केला.