कोटय़वधी रुपये खर्च करून लघुपाटबंधारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत, त्यातील काही प्रकल्प दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर शेतकरी पाण्याचा लाभही घेण्यास इच्छुक नसल्याने फक्त सिंचनाच्या प्रतीक्षेचे कागदी घोडे नाचवून अनुदान लाटण्यात लघुपाटबंधारे विभाग पुढाकार घेत आहे. त्यामुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या खिसेभरू संस्कृतीसाठीच प्रकल्प राबविले जात आहेत किंवा कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व वेंगुर्ले तालुक्यातील शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाच्या सुरस कथाही सांगण्यात येतात. या खात्यातील काही कर्मचारीच बेनामी ठेकेदार बनतात, तर नाममात्र काम करून कागदपत्र रंगविण्यात हे खाते माहीर असल्याचे बोलले जाते. त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाचे काम असून नसल्यासारखेच असल्याचे बोलले जात आहे.
माडखोल लघुपाटबंधारे प्रकल्पात लाभार्थी होते पण गेली काही वर्षे धरणाच्या दुरुस्ती अभावी लाभार्थीना पाणीच नसल्याने शेती बागायतीचे नुकसान झाले. हे धरण साडेतीन कोटी रुपये खर्च करून पुनश्च बांधले जात आहे. त्यामुळे राजकीय वादही रंगला, पण धरण होऊनही कालव्याअभावी धरणाचा फायदा होणार नाही हे राजकीय मंडळींनी पाहिले नाही. तेथे मात्र उघडय़ा डोळ्यांवर झापड आल्यासारखा प्रकार घडल्याची टीका शेतकरी वर्गात आहे.
माडखोलमध्ये ११० हेक्टर्स जमीन सिंचन लाभक्षेत्राखाली अपेक्षित आहे. या धरणाचे काम प्रगतिपथावर असले, तरी कालवा मंजूर नसल्याने धरणात पाणी साठवणूक होऊनही फायदा होणार नाही. या धरणाच्या कालव्यास साठ लाख रुपये अपेक्षित आहे. कालवे संकल्पनाच धुळीस मिळाल्याची या धरणाची समस्या बनली आहे.
कुडाळ तालुक्यातील निवेली धरणावर सव्वा कोटी रुपये खर्च झाले आहेत. तेथे कालवे नादुरुस्त आहेत. १०२ हेक्टर्स जमीन लाभक्षेत्र सिंचनाखाली असली, तरी प्रत्यक्षात १८ हेक्टर्समध्ये शेतकरी सिंचनाचा लाभ घेत आहेत. हाही चिंतेचा विषय बनला आहे.
शिरवल हा दोडामार्गातील प्रकल्प खरे तर शेतकऱ्यांना प्रिय ठरला होता. या प्रकल्पात लाभक्षेत्र सिंचन जिल्ह्य़ात अग्रभागी होते पण शिरवल धरणाच्या नादुरुस्तीनंतर या ठिकाणी ग्रहण लागले. या धरणाची १५० हेक्टर्स लाभ सिंचन क्षमता अपेक्षित आहे, पण ती फक्त ९० हेक्टर्स असल्याचे सांगण्यात आले.
कुडाळ तालुक्यातील पावशी धरणात ९७ हेक्टर्स लाभक्षेत्रात ९० हेक्टर सिंचन आहे, असे कार्यकारी अभियंता संदीप देवणे यांनी सांगितले. हातेली, ता. कुडाळ या धरणाच्या ६८ हेक्टर लाभक्षेत्रापैकी फक्त २० हेक्टरमध्येच सिंचन आहे. मात्र कालवे नादुरुस्त आहेत.
पुलास, ता. कुडाळ धरणात ७३ हेक्टर लाभक्षेत्रापैकी सात हेक्टर्स सिंचनाखाली क्षेत्र आहे. तळेवाडीमधील १८४ हेक्टर्सपैकी १२ हेक्टर्स लाभक्षेत्र असून सांडवा गळती व कालवा नादुरुस्त आहेत. चोरगेवाडी २१० हेक्टर्सपैकी फक्त २५ हेक्टर्स सिंचनाखाली आहे.
आंबोलीमध्ये १२४ हेक्टर्सपैकी २० हेक्टर्स लाभक्षेत्र असून, सनमटेंबमध्ये कालवा गळती असूनही १७० हेक्टर्सपैकी आठ हेक्टर्स, कारिवडेमध्ये ९० हेक्टर्सपैकी २५ हेक्टर्स सिंचन क्षेत्र असून कालवे नादुरुस्त आहेत. दानाची वाडी १६४ हेक्टर्स पैकी ४ हेक्टर्स लाभसिंचन क्षेत्र आहे.
  चोरगेवाडी कालवा नादुरुस्त आहे. ओरोस १८० हेक्टर्सपैकी २० हेक्टर्स सिंचन क्षेत्र असून कालवा काम अपेक्षित आहे. आडेली ७४ हेक्टर्सपैकी १२ हेक्टर्स लाभसिंचन क्षेत्र असून कालवा व पाइपलाइन नादुरुस्त आहे.
वाफोली धरणाची सिंचन क्षमता १०४ हेक्टर्स आहे, पण ती सध्या २५ हेक्टर्सवर आली आहे. या धरणाचे लाभ सिंचनक्षेत्र घटत आहे. तेथे ३० वर्षांपूर्वीचे कालवे असल्याचे सांगण्यात येते.
या पंधरा लघुपाटबंधारे धरणांपैकी शिरवल, पावशी, आंबोली, निळेली हीच धरणे काही प्रमाणात लाभसिंचन क्षेत्राचे उद्दिष्ट पूर्ण करत आहेत. शिरवल, माडखोल, निळेली, आंबोली, आडेली या पाच धरणांच्या पाणी वापर संस्था असून, अन्य दहा धरणांच्या पाणीवापर संस्थाच अस्तित्वात नाहीत.
या लघुपाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्ता, टीए बिल, ऑफिसचे वीज व टेलिफोन बिल भरलेच जात नाही, त्यामुळे लघुपाटबंधारे धरणाची मॅनेजमेंटच कोलमडली आहे. गेली दहा वर्षे लघुपाटबंधारे योजनांकडे कुणीही पाहिले नाही.  सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ांसाठी गेल्या तीन वर्षांत फक्त साडेतीन लाख रुपये देखभालीसाठी आले आहेत असे सांगण्यात आले.
शेतकरी कामगार नाहीत म्हणून सिंचन होत नाही, तर निधी नाही म्हणून देखभाल करता येत नाही, असे कार्यकारी अभियंता संदीप देवणे यांनी स्पष्ट केले. लघुपाटबंधारे विभागाच्या या कारभाराचे कोणालाही सुख-दु:ख नाही, असेच शेतकरी म्हणतात.