|| निखिल मेस्त्री

लेखनिक उपलब्ध होत नसल्याने परीक्षा देणे कठीण

पालघर : अलीकडेच बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असताना या परीक्षेचे पेपर लिहायचे कसे, असा प्रश्न अनेक दृष्टिहीन विद्यार्थ्यांना सतावत आहे. या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लेखनिक (रायटर) उपलब्ध न झाल्याने त्यांना परीक्षा देणे कठीण झाले आहे. त्यामुळे अशा दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी लेखनिक म्हणून मदतीचा हात हवा आहे, असे या दृष्टिहीन मुलांसाठी काम करणाऱ्या पर्ल्स ऑफ व्हिजनच्या उमेहानी बघत्रावाला यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

पालघर जिल्ह्यात अनेक दृष्टिहीन विद्यार्थी असून त्यांना लेखनिक मिळत नसल्याचे दिसून आले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे पालघर तालुक्यातील चिंचणी भागात राहणारा नावेद शेख हा विद्यार्थी आहे. तो सध्या बारावीची परीक्षा देत असून त्याला गेल्या अनेक दिवसांपासून लेखनिक मिळत नव्हता. अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर बघत्रावाला यांच्या आवाहनानंतर एक लेखनिक पुढे आला आणि त्याने नावेदला मदतीचा हात दिला.

काही ठरावीक शैक्षणिक संस्था असे लेखनिक उपलब्ध करून देत असले तरी ठरावीक विद्यार्थीवगळता लेखनिक म्हणून काम करण्यास कोणी उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे लेखनिक उपलब्ध करून देताना संस्थांची अडचण होत असल्याचे बघत्रावाला यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून त्या यासाठी काम करत असून अनेक ठिकाणी असे लेखनिक त्यांनी आवाहन करून उपलब्ध करून दिले आहेत.

दृष्टिहीनांना ज्या इयत्तेची परीक्षा द्यावयाची असते, त्या इयत्तेपेक्षा एक इयत्ता कमी असणारा लेखनिक देणे अपेक्षित आहे. मात्र ही शासनाची अट जाचक आहे. अशा जाचक अटीमुळे शक्यतो लेखनिक मिळणे कठीण होऊन बसते. यासाठी पर्यायी मार्ग काढणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लेखनिक उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव असला आणि तो शासनाने प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न केला असला तरी तो कागदावरच रेंगाळत आहे.

दांडेकर महाविद्यालयात कक्ष

पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्रा. रामदास येडे या अंध प्राध्यापकाच्या सहकार्यातून अंध विद्यर्थ्यांंसाठी एक कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी दिली. या शैक्षणिक वर्षांपासून अंध विद्यार्थ्यांसाठी लेखनिक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. केवळ दृष्टिहीनच नाही तर सर्व प्रकारच्या अपंग विद्यर्थ्यांंसाठी सहकार्याचा हात पुढे करणे हे एक जबाबदार समाजघटक म्हणून आपले कर्तव्य आहे, याची जाणीव आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. किमान त्यांच्या गरजा आणि समस्या काय आहेत या संबंधीचा विचार आपल्या मनात रुजणे आवश्यक आहे, असे सावे यांनी सांगितले.

सुरुवातीच्या काळात मला लेखनिक मिळण्याकरिता खूप अडथळे निर्माण व्हायचे. त्याचा खूप मानसिक त्रास व्हायचा. आपल्याला परीक्षा देता येईल की नाही अशी भीती निर्माण व्हायची. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आल्यावर ही अडचण बऱ्यापैकी दूर झाली. मला जशी मदत मिळाली तशी इतरांना मिरणे आवश्यक आहे. – प्रा.रामदास अंगद येडे, इतिहास विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय

शासनाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन दृष्टिहीनांना लेखनिक म्हणून मदतीचे हात वेळेत मिळवून देणे अपेक्षित असून विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. -उमेहानी बघत्रावाला, पर्ल्स ऑफ व्हिजन, दृष्टिहीनांसाठी काम करणारी संस्था