राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरातून पर्यटनासाठी पर्यटकांचा लोंढा महाबळेश्वर, पाचगणीला येत आहे. या गर्दीमुळे पाचगणी व महाबळेश्वर व परिसरात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाबळेश्वर, पाचगणी पालिकांनी सर्व पर्यटनस्थळांची ‘नाकाबंदी’ केली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्यापासून दूर रहावे लागणार आहे.

राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवून ई-पास रद्द केले, तसेच हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी दिल्याने पाचगणीत गर्दी वाढत आहे.  यामुळे  महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील व पाचगणीचे गिरीश दापकेकर यांनी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले व तहसीलदार सुषमा पाटील यांच्या सुचनेनंतर पालिकेची तातडीची बैठक घेऊन पर्यटनस्थळे, उद्याने, बाल उद्याने, खेळांची उद्यानांची नाकाबंदी केली आहे.

शासनाच्या निर्णयाने टाळेबंदीमध्ये कोंडलेले पर्यटक वाढून करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे महाबळेश्वर पालिकेने सर्व पॉईंट,पाचगणीत टेबल पॉइंट, सिग्ने पॉईंट, पारसी पॉईंट, बेबी पॉईंट ही सर्व पर्यटनस्थळे कुलूप बंद केली आहेत. काही पॉईंटच्या मुख्य रस्त्यांना अडथळे लावून प्रवेश बंद केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पर्यटक मोठय़ा संख्येने येत असून बरेच पर्यटक हे अडथळे बाजूला करून पुढे जात आहेत.

सहा महिन्यांपासून सर्वत्र टाळेबंदी व जिल्हाबंदी असल्यामुळे सर्व जण आपापल्या घरातच अडकून पडले होते.

आता टाळेबंदी उठविल्याने हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील हॉटेल व खासगी बंगल्यात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर, पाचगणी पालिकांनी  उपाययोजना करण्यासाठी कंबर कसली आहे.

शहरातील करोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकांनी  १२ पथके केली आहेत. शहरात मास्क न वापरणे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे, तसेच निष्कारण गर्दी करणाऱ्यांवर पोलीस व पालिकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

राज्य सरकारने ई-पास रद्द केले असले, तरी पर्यटनावर मात्र अद्यापही निर्बंध आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीतून शहर करोना संसर्गापासून रोखणे मोठे आव्हान आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. पर्यटकांना येण्यास राहण्यास बंदी नाही. मात्र त्यांना पर्यटनस्थळांवर फिरता येणार नाही. त्यांना बाजारपेठेत, हॉटेल, लॉजमध्ये जाता येईल. त्याला सर्व ग्रामस्थ, व्यापारी, व्यावसायिक व पर्यटकांनी सहकार्य करावे.

-पल्लवी भोरे पाटील, मुख्याधिकारी, महाबळेश्वर