News Flash

BLOG – ‘दगलबाज’ राज !

वारे कुठल्या दिशेला वाहतात याचं राजना अचूक भान

प्रबोधनकार ठाकरे यांची एक अत्यंत गाजलेली पुस्तिका आहे. १९२६मध्ये प्रकाशित झालेल्या त्या पुस्तिकेचं शीर्षक आहे – ‘दगलबाज शिवाजी’. या शीर्षकामुळे त्याकाळी वाद झाला होता. पुढे ‘माझी जीवनगाथा’ या आपल्या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी या शीर्षकामागची भूमिका सांगताना लिहून ठेवलंय की, ” (महाभारतातला) अर्जुन ‘बगलबाज’ होता. कर्तव्याला बगल मारून (रणांगणातून) पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा ‘दगलबाज’ होता. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट’. दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस’. इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो. कळले? ”

हा किस्सा आठवायचं कारण इतकंच की, काल शिवाजी पार्कच्या जाहीर सभेतलं राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे त्यांच्या इरसाल मुत्सद्देगिरीचा नमुनाच होता. एका बाजूला- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरुन गुजरातचा विकास-पाहणी दौरा करणारे राज ठाकरे, २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी मोदींना राजकीय पाठिंबा जाहीर करणारे राज ठाकरे आणि दुस-या बाजूला काल शिवाजी पार्कवर जमलेल्या लाखांच्या जनसमुदायासमोर बोलताना ‘मोदीमुक्त भारतासाठी सर्वच्या सर्व विरोधकांनी एकत्र यावं असं आवाहन करणारे राज ठाकरे पाहून राजकीय पंडित पण अवाक झाले असतील. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत असं जाहीर वक्तव्य करणारे राज ठाकरे ‘मोदीमुक्त’ भारताची जाहीर घोषणा करण्यापर्यंत कसे बदलले, का बदलले या प्रश्नांची उत्तरं त्यांनीच कालच्या त्यांच्या तब्बल एक तास २० मिनिटांच्या भाषणात दिली आणि विशेष म्हणजे त्यांची ही संपूर्ण मांडणी ठोस अभ्यासावर, निरीक्षणांवर आधारित होती. एरवी पुरोगामी वर्तुळातच ज्या विषयांवर-मुद्द्यांवर चर्चा होताना दिसते, ते मुद्दे राज यांनी प्रथमच राजकीय चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आणले. त्यामुळेच कदाचित, त्यांच्या वैचारिक विरोधकांनाही त्यांची ही मांडणी भावल्याचं (समाज माध्यमांमध्ये) दिसतंय.

पत्रकार निरंजन टकले यांनी शोधपत्रकारिता करुन देशापुढे आणलेलं जस्टिस बी. एच लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण समाजस्मृतीतून विस्मरणाच्या वाटेवर असतानाच या प्रकरणाच्या खटल्यासंबंधीची अत्यंत वेगळी व महत्वाची माहिती राज यांनी मांडली. “जस्टीस लोयांच्या मृत्यूची केस एका महिला न्यायाधीशाकडे होती, त्या निस्पृह होत्या म्हणून त्यांच्याकडून केस काढून घेतली असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात १०० न्यायाधीशांची बदल्या केल्या” ही राज यांनी उघड केलेली बाब निश्चितच खळबळजनक आहे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे न्यायव्यवस्थेला स्वत:च्या मुठीतच ठेवू इच्छिणा-या सरकारचं राक्षसीरुप दाखवणारी आहे. हुकूमशाही मनोवृत्तीचं मोदी-शहांचं नेतृत्व आणि भाजपचं सरकार गेली चार वर्षं न्यायव्यवस्था तसंच पत्रकारिता या लोकशाहीच्या दोन स्तंभांनाच धडका देत असल्याचं सांगायलाही राज विसरले नाहीत. मोदी-शहा ही जोडी हिटलरच्या प्रचारतंत्राचा वापर करत असल्याचं फक्त सांगून राज थांबले नाहीत, तर त्यांनी त्याची अनेक उदाहरणंही दिली.

भारतात जन्माला येऊन कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारणारा अभिनेता अक्षयकुमार याच्या पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमांना भाजपने आर्थिक पाठबळ पुरवल्याचं उदाहरण यासंदर्भात खूप महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधल्या काही पत्रकारांवर सरकारी यंत्रणांकडून टाकला गेलेला दबाव याबाबतही राज ठाकरे बोलले. मीडियाला नियंत्रित करण्याचं भाजप सरकारचं धोरण स्पष्ट करताना राज य़ांनी “मेट्रोच्या विरोधात कोणत्याही बातम्या द्यायच्या नाहीत असे सक्त आदेश आहेत असं मला काही पत्रकारांनी सांगितलं” असंही बेधडकपणे सांगून टाकलं. भाजप सरकार केवळ मीडियाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत नाहीए तर, जनतेला सरकारी माहिती उपलब्धच होणार नाही याची पूर्ण दक्षता घेत असल्याचंही राज यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं ते बेरोजगारांच्या नोंदणीचं. बेरोजगारांची नोंदणीच करायची नाही असा आदेश केंद्र सरकारने काढल्यामुळे नक्की किती बेरोजगार आहेत याचा आकडा कधीच कळणार नाही, असं राज म्हणाले. दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या घोषणा – आश्वासनं देणा-या सरकारचं पितळ उघडं करणारा हा मुद्दा आहे.

मंत्रालयात आत्महत्या करणारे वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांची केसस्टडी मांडत राज यांनी राज्यातील शेतजमीन विक्रीतील दलालांचा भांडाफोड केला. वसईतील वनजमिनींवर हजारो अनधिकृत चाळी बांधणा-या परप्रांतीयांच्या रॅकेटचाही त्यांनी पुराव्यांसह उल्लेख केला. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोहोंवर टीका करताना आपलं कोणतंही टीकास्त्र वाया जाणार नाही, याची पुरेपूर दक्षता राज यांनी कालच्या भाषणात घेतली. नोटबंदी, मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या फसव्या घोषणांपासून ते ५५० कोटींची राफेल विमानं खरेदी करण्यासाठी १६०० कोटी रुपये मोजणा-या भाजप सरकार आणि अनिल अंबानींचा रिलायन्स ग्रुप यांचं साटंलोटंपर्यंतच्या अनेक गोष्टींचा राज यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला, पण खरा राजकीय षटकार ठोकला तो राममंदिराच्या मुद्द्यावरुन नजीकच्या भविष्यात देशात हिंदू-मुस्लीम दंगली घडवण्याचा भाजपचा डाव आहे, हे सांगून. “राम मंदिर मलाही हवंय, पण निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराच्या नावाखाली दंगली होणार असतील तर मंदिर पुढच्या वर्षी निवडणुकांनंतर झालं तरी चालेल”, हे राज यांचं म्हणणं त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची साक्ष देणारं आहे. भाजपचं बनावट धर्मांध राजकारण आणि कांग्रेसची बेगडी धर्मनिरपेक्षता या दोन्हींपेक्षा माझी भूमिका वेगळी असल्याचं ठसवण्याचा प्रयत्न राज यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करुन राज थांबले नाहीत, काँग्रेसविरोधात मोदींनी ज्या प्रतिमांचा वापर केला त्या प्रतिमांना मराठी समाजमनातून उखडून टाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पंडित नेहरुंवर टीका करताना एरवी भाजपसह देशातील समस्त उजव्या राजकीय पक्षांना जवळचे भासणारे आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांचे आदर्श सरदार वल्लभभाई पटेल हेसुद्धा महाराष्ट्रविरोधी होते, असा मुद्दा राज य़ांनी आचार्य अत्रेंच्या अग्रलेखाचा हवाला देऊन मांडला. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी नेहरूंवर वल्लभभाई पटेलांचा दबाव होता, असं सांगत “जी मुंबई गुजरातच्या हातातून गेली ती परत मिळवण्यासाठी बुलेट ट्रेन हा प्रकल्प आहे”, अशी मांडणी करत राज यांनी बुलेट ट्रेनला असलेला त्यांचा विरोध पुन्हा एकदा ठामपणे अधोरिखित केला.

१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांनी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना इंदिरा गांधींच्या काँग्रेसविरोधात एकत्र येण्याचं आवाहन करताना दुस-या स्वातंत्र्याची हाक दिली होती. १९७७मध्ये आलेलं जनता सरकार हे जेपींच्या नवनिर्माण आंदोलनातून जन्मलेलं होतं. त्यानंतर ४२ वर्षांनी मोदींच्या भाजप सरकारविरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन करत तिस-या स्वातंत्र्याची हाक राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यांच्या या हाकेला इतर पक्ष प्रतिसाद देतील का? २०१९मध्ये खरोखरच भाजपचा पराभव झाला तर त्याचं श्रेय राज ठाकरेंना मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. पण एक मात्र निश्चित की, देशातले वारे नेमके कोणत्या दिशेला वाहताहेत हे ओळखण्यात ‘दगलबाज – डिप्लोमॅट’ राज ठाकरे पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत.

– कीर्तिकुमार शिंदे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 2:52 pm

Web Title: blog diplomatic raj thackrey
Next Stories
1 ‘अजब है मोदी का खेल, एक आदमी को जेल, एक आदमी को बेल’
2 चारा घोटाळा – चौथ्या खटल्यातही लालूप्रसाद यादव दोषी
3 गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज स्थगित, अविश्वास प्रस्ताव उद्यापर्यंत बारगळला
Just Now!
X