25 March 2019

News Flash

BLOG: पाय बोलतात तेव्हा…

हा लढा सोशल मीडियावरून जगभर पोहचला

पायाच्या भाषेतल्या उद्रेकान सत्ताधार्यांना हलवून सोडलं

एक एक पाऊल निर्धाराने विधान भवनाच्या दिशेनं पुढं जात होतं. तसा शांत वाटणारा त्याचा आवाज पावलागणिक वाढत होता. आतापर्यंत व्यवस्थेनं पोटावर पाय दिला हे सांगण्यासाठी मातीत राबणारे पाय, भर उन्हात डांबर तुडवीत शहराच्या दिशेनं सरसावले होते. त्यांना खूप काही सांगायचं होतं. ते भरभरून सांगत होते. त्याची एक भाषा होती. शब्दांच्या, डोळ्याच्या आणि देहबोलीच्या भाषेपेक्षा ती खूप सोप्पी होती. फक्त ती उमगण्यासाठी मन असावं एवढीच अट होती. आभासी जगातून तीचा होणारा भास, जाणवणारी दाहकता मनाला सुन्न करत होती. तशा काळजाला भेगा पडत होत्या. मातीतल्या बापापासून शहरात आलेल्या मुलांना ते पाय वर्षानुवर्षे आपला बाप सहन करत असलेल्या वेदना मुक्या शब्दात ओरडून ओरडून सांगत होते. म्हणून महाराष्ट्र भरातून काळ्या आईच्या लेकरांचे लाखों हुंकार शब्दरूपात उमटत होते. प्रत्येक्ष सहवास नसला,तरी भावना उत्कट होत्या. शिवारापासून नाळ तुटली त्यांचं मन सुद्धा माय-बापाच्या आठवणी भोवताली घिरट्या घालत होतं. झेंड्याच्या रंगापेक्षा हितं रक्ताचा रंग आपला वाटतं होता. म्हणून प्रत्येक जण ‘लाल सलाम’ करत रक्ताभिषेक करत क्रांतीची वाट तुडवत होता. त्यांना न्यायक्रांती हवी होती.

जवळपास 60 हजार पाय, शेकडो मैलाचा प्रवास करून मायनगरीत दाखल झाले होते. तर नाशिक येथून सुरू झालेला हा लढा सोशल मीडियावरून जगभर पोहचला होता. भाडोत्री गर्दीच्या काळात घामाच्या हक्कासाठी ही गर्दी बाहेर पडली होती. न्यायासाठी त्यांचं झिजणं पाहून ते पाय सर्वांना पुज्यनिय वाटतं होते. आता हा फक्त मोर्चा राहिला नव्हता. शेतकऱ्यांच्या नावावर जन आक्रोश एकवटला होता. रस्त्यावर आणि डिजिटल इंडियामध्ये एकाचं वेळेला सोबत लढा लढला जात होता.शेतकरी बाप मनातल्या निर्धाराने पुढे पाऊल टाकत होता. तर सोशल मीडियावर त्याची लेकरं शब्दाचे भाले करून हक्काची लढाई निकरानं लढत होती. मन आणि मेंदू त्यासाठी एकवटला होता. त्यामुळे पेड सोशल आर्मीपेक्षा हा लढा अधिक धारदार होता. डिजिटल भाषा समजणाऱ्या या सरकारला त्यांच्या भाषेत प्रश्न समजून सांगितलं गेला होता. रस्त्यावचे हजारो पाय फेसबुक वॉलवर आले होते. आणि त्यासोबतीला भावना होत्या. मातीत सांडलेल्या घामाचा भाव शेतकरी मागत होता. त्यासाठी रक्त सांडण्याची तयारी होती. त्यामुळे मनसे पासून काँग्रेसपर्यंत सगळ्या पक्षाना या लाल बावट्यान भुरळ घातली होती. अनेकांच्या मनात मात्र रक्ताळलेल्या पायांसमोर ‘लाल सलाम’ होता.

शेतकरी, शेतमजुरांच हे लाल वादळ पाहिल्यानंतर अनेकांना धडकी भरली. सत्तेच्या खुर्चीच्या उबेला बसलेल्या कोणाला त्यात माओवाद डोकावत असल्याची भीती वाटली. तर त्यांची हुजरेगिरी करणारं कोणी वारूळ उध्वस्त झाल्यावर लाल मुंग्या चवताळणारच अस म्हणत होतं. मात्र या सर्वांचा आवाज सखुबाईच्या पायाच्या आवजात फिका वाटतं होता. कारण त्याला राजकारनाचा वास नव्हता. वास्तवाची भाषा होती. त्यामुळे ती अभिजात होती. त्याला कोणीच नाकारू शकत नव्हतं. अनवाणी पायानं सखुबाईंनी शेकडो किलोमिटरची वाट तुडवली. पायातल्या चपला तुटल्या म्हणून त्या थांबल्या नाहीत. तर अनवाणी पायानं मनातल्या निर्धारानं पुढे पाऊल टाकत गेल्या. त्यामुळे झालेल्या जखमा आणि फोड आलेल्या पाय पाहिल्यानंतर प्रत्येकाचं ह्रदय द्रावल. शेतकऱ्यांच्या मोर्चाला आभासी जगात प्रतिवाद ही होत होता. मात्र एसी केबिनमध्ये बसून शेतकऱ्यांच्या घामाची टिंगल टवाळी करणाऱ्यांना त्यानं कृतीतून उत्तर दिलं. दहावी आणि बारावीच्या विध्यार्थ्यांच्या परिक्षेचा मोर्चामूळे खोळंबा होऊ नये म्हणून दिवसभर चालून दमलेला देह घेऊन शेतकऱ्यांनी रातोरात चुनभट्टी ते आझाद मैदान हे अंतर पार केलं. आणि अनेकांना याचा सुखद धक्का बसला. अडाणी शेतकऱ्यांच्या या विचारी कृतीमुळे अनेकजण भरभरून बोलले.

नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील अाझाद मैदानात दाखल झाला. मोर्चानं इतिहास घडवला. त्यांच्या पायाच्या भाषेतल्या उद्रेकान सत्ताधार्यांना देखील हलवून सोडलं. म्हणून सरकारनं आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. भूमिहीन आदिवासींच्या जमिन प्रश्नांचा सहा महिण्यात निपटारा, 2001 पासून कर्जमाफी, बोंडअळी आणि गारपिटीमुळे नुकसान ग्रस्तांना तात्काळ मदत, तसेच स्वामीनाथ आयोगासाठी केंद्रसरकरकडे पाठपुरवठा करण्याची फडणवीस सरकारने लेखी हमी दिली. त्यामुळे हे वादळ शांत झालं. आता अपेक्षा आहे.आश्वासनांची अंमलबजावणी करताना सरकारनं नियम आणि अटीचा खोडा घालू नये.

– आप्पासाहेब शेळके

First Published on March 13, 2018 1:50 pm

Web Title: blog kisan long march their feet talked thousand stories