– कीर्तिकुमार शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘प्रसिद्धी विनायक’ संबोधून मोदीरुपातील गणरायाचे व्यंगचित्र रेखाटल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा एकदा ब-या-वाईट प्रतिक्रियांना सामोरं जावं लागत आहे. मोदीरुपातील या गणरायाच्या एका हातात ईव्हीएम मशीन, दुस-या हातात वर्तमानपत्रं, तिस-या हातात वृत्तवाहिन्यांचा कॅमेरा तर चौथ्या हातात पक्षनिधी म्हणून पैशांचं पुडकं राज यांनी रेखाटलं आहे. व्यंगचित्रातील मूर्तीमागे पैशांनी भरलेल्या गोणी आहेत, तर मूषकरुपात अमित शहा ‘मोदीराया’चे वाहन बनले आहेत. या व्यंगचित्राचा परमोच्च बिंदू म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च या ‘मोदीराया’ची आरती ओवाळत आहेत! तर अमित शहा हे टाळ कुटायला, नितीन गडकरी हे टाळ्या वाजवायला, तर राजनाथ सिंह हे चित्रात नुसतेच ‘हजर’ आहेत. “स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक” असं शीर्षक राज यांनी या व्यंगचित्राला दिलेलं आहे.

व्यंगचित्राची पार्श्वभूमी काय?

राज यांच्या या व्यंगचित्राला पार्श्वभूमी आहे ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत एक लघुपट महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार असल्याच्या बातमीची. ‘टिंग्या’फेम मंगेश हडवळे या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला ‘चलो जीते हैं‘ हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास इतर काही राज्यांनी विरोध केलेला असताना महाराष्ट्रात मात्र हा लघुपट दाखवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं वृत्त लोकसत्ताने तीन-चार दिवसांपूर्वीच दिलं होतं. स्वत: पंतप्रधानपदावर असताना स्वत:वर बनवून घेतलेला लघुपट स्वत:चंच सरकार असताना शालेय विद्यार्थ्यांना सक्तीने बघायला लावणं म्हणजे स्वत:च स्वत:ला ओवाळण्याचा प्रकार, हे राज यांच्यातील व्यंगचित्रकाराने अचूक हेरलं.

राज यांच्याकडून मोदींचे प्रतिमाभंजन!

‘देशाबाहेर गेलेला काळापैसा देशात पुन्हा आणून प्रत्येक भारतीयाच्या बॅंक खात्यात १५ लाख रूपये जमा करेन’, असं तद्दन खोटारडं आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत स्वत:ची प्रतिमा उजळवून घेण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा आधार घेतला. त्यासाठी सोशल मीडियापासून ते दैनिकं-वृत्तवाहिन्यांना पैशाने विकत घ्यायलाही ते आणि त्यांचा भाजपा कचरले नाहीत. आज देशात पेट्रोलचे भाव शंभरी ओलांडतात की काय, अशी शंका असताना आणि त्यामुळे महागाईचा वणवा पेटलेला असताना सर्वसामान्य नागरिकांना मात्र पेट्रोलपंपावर तोंड दाबून मोदींच्या हस-या छबीचे बुक्के सहन करावे लागत आहे, याहून मोठे दुर्दैव ते कोणते?

२०१४च्या लोकसभा निवडणुकीआधी “नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत”, असं सर्वात आधी म्हणणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच दोन वर्षांपूर्वी “नरेंद्र मोदी हे देशाचे नाहीत, तर गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत”, असं बेधडकपणे बोलायला सुरुवात केली. मोदी सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटी यांमुळे देशाचं आर्थिक कंबरडं मोडलं, अशी मांडणी राज यांनीच सर्वात आधी अत्यंत सविस्तर आकडेवारीसह जाहीर सभांमधून मांडली. अहमदाबाद-मुंबई मेट्रो रेल्वेला विरोध करताना तर राज यांनी थेट मोदींनाच आव्हान दिलं. त्यामुळे देशपातळीवर आणि राज्यपातळीवरही विरोधी पक्ष कमकुवत झालेले असताना, आणि त्यांच्या तोंडून मोदींच्या विरोधात ब्रसुद्धा निघत नसताना राज ठाकरे यांनी मात्र गेल्या दोन वर्षांत मोदींवर टीका करण्याची एकही संधी वाया घालवली नाही. इतकंच नव्हे, तर मोदींच्या ‘कांग्रेसमुक्त भारत’ या घोषणेप्रमाणेच राज यांनीही ‘भाजपमुक्त भारता’साठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं. त्यामुळे मोदींच्या अवास्तव प्रतिमेचं भंजन करण्यास राज यांनीच पुढाकार घेतला, असं म्हटल्यास ते गैर ठरणार नाही.

संघ-मोदींकडून नेहरू-गांधी घराण्याचं चारित्र्यहनन!

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू हे तब्बल १७ वर्षं पदावर होते. देशात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार होईल आणि औद्योगिकरणाद्वारे देशात संपत्ती निर्माण होईल, असा त्यांनी प्रयत्न केला. त्यात त्यांना किती यश आलं, हा वादाचा प्रश्न असला तरी त्या काळातील देशाच्या राजकीय व्यवस्थेत त्यांचं महत्व इतकं अनन्यसाधारण होतं की, “आफ्टर नेहरू, हू?” – “नेहरूंनंतर, कोण?” असा सवाल तेव्हा विचारला जायचा. याच शीर्षकाने अनेक लेखच नव्हे तर पुस्तकही लिहिलं गेलं आहे. तर अशा या नेहरूंवर, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या धोरणांवर टीका करण्याची एकही संधी आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोडलेली नाही. संघाच्याच मुशीत तयार झालेल्या आणि संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या नरेंद्र मोदी यांनीही २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर स्वत: पंतप्रधान झाल्यानंतरही जवाहरलाल नेहरूंवर नको नको ती टीका केली. अनेक भाषणांमध्ये जिथे नेहरूंचा उल्लेख करण्याची किंवा नेहरूंवर टीका करण्याची काहीही आवश्यकता नव्हती तिथेही पंतप्रधान मोदी यांनी नेहरूंवर टीका केल्याची उदाहरणं आहेत. ‘काश्मीर समस्येला जबाबदार कोण- नेहरू’! ‘देशातील मागासलेपणाला जबाबदार कोण- नेहरू’!! देशातील भ्रष्टाचाराला जबाबदार कोण- नेहरू’!!! … अशा प्रकारे देशातील प्रत्येक समस्येला, वाईट गोष्टीला नेहरूंना जबाबदार धरत नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या गेल्या सुमारे ७० वर्षांच्या इतिहासात ‘नेहरू’ या नावाची जी प्रतिमा तयार झाली होती, तिचा विध्वंस केला. नेहरूंची निंदानालस्ती केल्याशिवाय इंदिरा गांधी- राजीव गांधी- सोनिया गांधी-राहूल गांधी यांचं चारित्र्यहनन अपूर्ण राहील याची मोदींना पूर्ण कल्पना होती. गेल्या पाच वर्षांमधील मोदींची भाषणं ज्यांनी ऐकली असतील, त्यांना हा मुद्दा आणखी सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही.

व्यंगचित्रच बनलं राज यांचं शस्त्र!

नेहरू-गांधी घराण्यावर नरेंद्र मोदी करत असलेल्या टीकेतील विरोधाभास गेल्या काही वर्षांत सातत्याने जर कुणी टिपला असेल तर तो व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी. कांग्रेसने वल्लभभाई पटेलांना डावलून जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान केले, या नरेंद्र मोदी यांच्या जाहीर वक्तव्याची खिल्ली राज यांनी व्यंगचित्रादवारे गांधीजींच्या साक्षीने उडवली. (पहा-व्यंगचित्र) गुजरात निवडणुकीच्या निकालांनंतर ‘कोण जिंकलं, कोण हरलं’ हे व्यंगचित्र काढून राज यांनी मोदी-शहा जोडगोळीला त्यांची गुजरातमधली ‘पायरी’ दाखवून दिली (पहा-व्यंगचित्र), तर कर्नाटक निवडणुकीनंतर अमित शहा यांच्या ‘घशात हात घालून सत्ता खेचून बाहेर काढणा-या’ राहुल गांधींचं व्यंगचित्र रेखाटून राज यांनी अमित शहांवर टीका करतानाच, राहुल गांधींच्या सकारात्मक प्रतिमानिर्मितीला हातभारच लावला (पहा-व्यंगचित्र). पेट्रोलची भाववाढ झाली तेव्हा राज यांनी काढलेलं “हॅंड्सअप, निकाल पैसा” हे व्यंगचित्र तर त्यानंतर प्रत्येकवेळच्या भाववाढीच्या विरोधातील असंतोषाचं प्रतीकच बनलं.

पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९

‘प्रसिद्धी विनायक’ हे व्यंगचित्र भाजपच्या वरपासून खालपर्यंतच्या सर्व नेत्यांना-पदाधिका-यांना बोचलं खरंच, पण त्यांपैकी एकानेही या व्यंगचित्राबाबत उघडपणे प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. कारण, आज राज यांनी फक्त व्यंगचित्रातून टीका केली आहे, उद्या त्याच मुद्द्यांबाबत जाहीर सभेत रोखठोख टीका केली तर त्याला उत्तर देऊ शकेल, असा एकही नेता भाजपकडे राज्यातच काय, देशातही नाही. म्हणूनच नेहमीप्रमाणे भाजपने आधार घेतला तो त्यांच्या छुप्या सैन्याचा- ट्रोल आर्मीचा. ‘पुन्हा नरेद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ सारख्या भाजप पुरस्कृत फेसबुक पेजवरून राज ठाकरेंवर ‘अपौरुषेय’ टीका करण्यात आली. “लाखो हिंदूंच्या लाडक्या गणपतीची आणि मूषकराजाची विटंबना”, “मोदीजींवर टीका करण्याच्या नादात राज ठाकरेंनी केला गणपती बाप्पाचा अपमान” अशा आशयाच्या टीकेचा भडीमार सुरू केला. पण, नरेंद्र मोदींना गणराय म्हणून रेखाटलं तर त्यात गणरायाचा अपमान कसा काय होतो, हे स्पष्ट करण्याचां प्रयत्न एकानेही केला नाही. समजा, नरेंद्र मोदी हे गुन्हेगार, भ्रष्टाचारी, खुनी अशा प्रकारचे ‘दानवी’ व्यक्तिमत्व असेल, तर त्यांच्या रुपात गणरायाला दाखवलं म्हणून गणरायाचा अपमान झाल्याची बोंब मारता येईल. म्हणजे, जे लोक गणपतीबाप्पाचा अपमान झाला, हिंदू देवतेची विटंबना झाली अशा बोंबा मारत आहेत, त्यांच्या म्हणण्यात एक विचित्र विरोधाभास आहे.

फक्त व्यंगचित्र नव्हे, हे तर भविष्याचं चित्रण!

नरेंद्र मोदींना ‘प्रसिद्धी विनायक’ संबोधून राज यांनी काढलेल्या चित्रावर भाजपचे ट्रोल्स वारेमाप टीका करताना दिसत आहेत. अर्थात, त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे, हे व्यंगचित्र मोदी-शहा आणि भाजपला प्रचंड बोचणारं आहे, हे आहेच. पण त्याचबरोबर आणखीही एक मुद्दा आहे. तो म्हणजे, पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात गणरायाला नरेंद्र मोदींच्या रुपात दाखवण्याचा डावसुद्धा आपोआपच उधळला गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून – रा.स्व.सं. स्वयंसेवकाच्या गणवेषातला गणपती (आणि उंदिरही), मोदींसोबत समोरासमोर खुर्चीवर बसलेला गणपती, मोदींनी खांद्यावर घेतलेला गणपती अशा प्रकारच्या गणेशमूर्ती भाजपच्या समर्थकांकडून घडवल्या जात होत्या. संघ-भाजपचा हा ट्रेण्ड पाहता, स्वातंत्र्यपूर्वकाळात सार्वजनिक गणेशोत्सवात ज्याप्रमाणे गांधी-नेहरू-सुभाषचंद्र यांच्या रुपात गणरायाच्या मूर्ती साकारल्या जात, तसे मोदींच्या रुपातले गणराय- ‘मोदीराय’ साकारून त्याचा लाभ निवडणुकीच्या प्रचारासाठी उपटण्यास भाजपने मागे-पुढे पाहिले नसते.

स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेला पंतप्रधान निवडणूका जिंकण्यासाठी, प्रचाराचे नवनवीन मार्ग शोधतानाही कोणत्याही थराला जाऊ शकतो, याबाबतची एक अत्यंत गंभीर शक्यता राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून मांडली आहे. जॉर्ज ऑर्वेलच्या ‘१९८४’ (नाइन्टीन एटी-फोर) या कादंबरीसारखंच राज ठाकरे यांचं हे ‘प्रसिद्धी विनायक’ व्यंगचित्र म्हणजे मोदी-शहा यांसारख्या भाजप नेत्यांच्या सर्वंकष हुकूमशाही-नार्सिसिस्ट मानसिकतेचं चित्रण आहे. त्यात गणरायाचा अपमान होण्याचा प्रश्नच नाही, पण इथल्या लोकशाही व्यवस्थेची मात्र निश्चितच खिल्ली उडाली आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog narendra modi raj thackrey lord ganesh
First published on: 19-09-2018 at 13:10 IST