शहीद जवानांच्या त्यागातूनच सन १९७१ सालच्या ऐतिहासिक भारत-पाकिस्तान युद्धात भारताने नेत्रदीपक विजय मिळवला. या युद्धामुळे पाकिस्तानी लष्कराचे भारतीय उपखंडातील उपद्रवमूल्य नष्ट झाले. या युद्धात त्यांचे कंबरडेच मोडले. त्याची स्मृती जपली तरच उगवत्या पिढीत क्षात्रतेज आणि त्यागभावना जिवंत राहतील, असे प्रतिपादन वीरपत्नी रेवाताई कुलकर्णी यांनी केले.
स्नेहालयच्या वतीने भारत-पाकिस्तान युद्धाच्या ४४व्या विजयदिनाच्या निमित्ताने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञाचे उद्घाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या. स्नेहालय संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. श्याम आसावा, सुवालालजी िशगवी, राजीव गुजर आदी या वेळी उपस्थित होते. स्नेहालयच्या युवानिर्माण प्रकल्पांतर्गत युवक शिबिरात सहभागी झालेल्या युवा सेवाव्रतींनी महाराष्ट्रात २८ ठिकाणी अशा उपक्रमांचे आयोजन केले होते.
 कुलकर्णी म्हणाल्या, भारताच्या सीमेवर अहोरात्र सज्ज असणाऱ्या आणि प्रसंगी स्वत:च्या प्राणांची बाजी लावून देशरक्षण करणाऱ्या लष्करामुळे आपण शांतता आणि प्रगतीची अनुभुती घेतो. अशा रक्तदानासारख्या प्रेरक उपक्रमातून सीमेवरील जवानांचे मनोबल वाढवण्यास हातभार लागले.
जनकल्याण रक्तपेढीने स्नेहांकुर प्रकल्पात तर अर्पण रक्तपेढीने औद्योगिक वसाहतीमधील श्रीराम कोटिंग कंपनीत रक्तसंकलन केले. १०२ जणांनी या वेळी रक्तदान केले. सुमारे ३०० नागरिकांनी नेत्र, देहदान आणि अवयवदानाचे अर्ज भरून दिले. स्नेहालय माजी विद्यार्थी संघाचे पूजा गायकवाड, अजय काळे, संतोष धर्माधिकारी, राहुल जाधव, विकास पाटील यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. अनामप्रेम संस्थेतील ३० अंध-अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांनीही रक्तदान केले.