काँग्रेसच्या अभियानात ४४० जणांचे स्वयंस्फूर्त रक्तदान

अकोला : करोना संकट काळात रक्तदानासारख्या पवित्र कार्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. या विधायक कार्यात मोठय़ा संख्येने सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे ऋण कदापि फेडू शकणार नाही, अशा भावना काँग्रेस नेते व खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी व्यक्त केल्या.

करोना महामारीसोबतच रक्ताचा तुटवडा असल्याने प्रदेश काँग्रेसच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खामगाव मतदारसंघात दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनात १४ एप्रिल ते १ मे या पंधरवडय़ात महारक्तदान अभियान घेऊन ५०० पिशव्या रक्त संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. या अभियानांतर्गत खामगाव येथे संत तुकाराम महाराज सभागृहात काँग्रेसच्यावतीने आयोजित महारक्तदान शिबिरात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, अलकादेवी सानंदा, खामगाव तालुकाध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार, शेगाव तालुकाध्यक्ष विजय काटोले, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील, माजी जि.प.अध्यक्ष वर्षां वनारे, जिल्हा उपाध्यक्ष सरस्वती खासने, पं.स. सदस्य विठ्ठल सोनटक्के आदींसह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. दिलीपकुमार सानंदा यांचे चिरंजीव दिग्विजयसिंह सानंदा यांनी रक्तदान करून महारक्तदान शिबिराला सुरुवात केली. काँग्रेसच्या महारक्तदान शिबिरात ४४० जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून विधायक कार्यात अनमोल वाटा उचलला. गेल्या १५ दिवसांमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून विविध गावात रक्तदान अभियान राबवण्यात आले. संकटसमयी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा मंत्र्यांच्या हस्ते गौरव करून त्यांचा उत्साह वाढवण्यात येईल, असे दिलीपकुमार सानंदा यांनी जाहीर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक किशोरआप्पा भोसले व माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर यांनी, तर आभार तालुकाध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

विविध विधायक उपक्रम 

देशभरासह राज्यात करोनाचे महामारीने थैमान घातले असल्याने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी वाढदिवसानिमित्त कुठलेही पुष्पगुच्छ, शाल, हार न स्वीकारता रक्तदानाचा अनमोल उपक्रम घेतला. यासोबतच गरजूंसाठी विविध साहित्य वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले.