गरजू रुग्णांना तत्काळ सुरक्षित रक्त उपलब्ध व्हावे, या हेतूने सुरू झालेली ‘ब्लड ऑन कॉल’ योजना लवकरच नांदेड जिल्ह्यात कार्यान्वित होणार आहे. रक्ताच्या अपुऱ्या साठय़ामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात रक्तविक्रीचा काळाबाजार सुरू आहे. शासकीय रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा असल्याने काही खासगी रक्तपेढय़ा रुग्णांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
निकड असलेल्या रुग्णांना तत्काळ सुरक्षित रक्त उपलब्ध व्हावे, या साठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने काही महिन्यांपूर्वी ‘ब्लड ऑन कॉल’ योजना सुरूकेली. सुरुवातीला काही जिल्ह्यांत ही योजना सुरू झाली. गरजू रुग्णांना सुरक्षित रक्त वाजवी किमतीत इच्छित स्थळी उपलब्ध व्हावे, हा या योजनेमागचा प्रमुख हेतू आहे. अनेकवेळा रुग्णांना रक्तपेढीचे पत्ते माहीत नसतात. ऐनवेळी त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. या पाश्र्वभूमीवर ही योजना सुरू झाली आहे. राज्यातील अन्य भागाप्रमाणेच नांदेडात ही योजना कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आली आहेत.
राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे राज्य समन्वयक अधिकारी डॉ. अरुण चौधरी यांच्या उपस्थितीत अलीकडेच आयोजित बठकीत जिल्ह्यात ही योजना सुरूकरण्याच्या दृष्टीने आवश्यक ते निर्देश देण्यात आले. विभागीय रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. किरण खैराटकर यांच्या पुढाकाराने ही बठक झाली. शासकीय रुग्णालयात उपलब्ध रक्तसाठा गरजू रुग्णांना तत्काळ मिळणार आहे. १०४ या क्रमांकावर डायल केल्यानंतर पुणे येथून संबंधित जिल्ह्यात आवश्यक त्या रुग्णालयात गरजू रुग्णाला रक्तपुरवठा करण्याचे आदेश मिळणार आहेत. दूरध्वनी केल्यानंतर तासाभरात ४० किलोमीटर अंतरावरील परिसरातील कोणत्याही रुग्णालयात आवश्यक रक्त मिळणार आहे. तपासणी शुल्क १ हजार ५० व समुपदेशन ५० रुपये असे एकूण १ हजार १०० रुपये संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना द्यावे लागतील.
ही योजना गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. प्राथमिक टप्प्यात केवळ शासकीय रक्तपेढीचाच वापर होणार आहे. भविष्यात काही खासगी रक्तपेढय़ांनी सहभाग नोंदविण्याची तयारी दर्शविली तर त्यांचे स्वागतच होईल, असे डॉ. खैराटकर यांनी सांगितले. शीत साखळीद्वारे वाजवी किमतीत रक्त मिळणार असल्याने रुग्णांची सोय होणार आहे. शिवाय उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही तत्काळ उपचार करणे शक्य होईल. शासकीय रुग्णालयास रक्तदान शिबिराव्यतिरिक्त जास्त रक्त मिळत नाही. या पाश्र्वभूमीवर जनजागृती सुरूअसल्याचे ते म्हणाले. सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान असल्याने नागरिकांनी विशेषत: युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.