रक्तदाते मिळत नसल्याने रक्तपेढीत ठणठणाट

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : करोना महामारीमुळे रुग्णांना रक्त मिळणे आवश्यक आहे. मात्र वसई-विरारमध्ये रक्ताचा तुटवडा जाणत आहे. रक्तदाते पुढे येत असल्याने रक्तपेढीत पुरेशा प्रमाणात रक्त नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरजूंना रक्त मिळणे कठीण झाले आहे.

वसई-विरारमध्ये केवळ तीनच रक्तपेढय़ा आहेत. यातही केवळ एकाच रक्तपेढीचा पालिकेशी करार आहे. वसई-विरारमध्ये असलेल्या रक्तपेढीची क्षमता केवळ १००० युनिट रक्त साठवण्याची आहे. यात सध्या केवळ ३५० ते ४०० युनिट रक्त जमा होत आहे. त्यातही होल ब्लड सेल, प्लेटलेट्स आणि सिंगल डोनर प्लेटलेट्स अशी वर्गवारी होत असल्याने त्याची संख्या अधिक कमी होत जाते. यामुळे मागणीच्या प्रमाणात रक्तपुरवठा नगण्य असल्याने गरजूंना रक्त मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. वसई-विरारमध्ये रक्त मिळत नसल्याने गरजूंना ठाणे, मुंबई या ठिकाणाहून खासगी रक्तपेढीतून दामदुप्पट पैसे देऊन रक्त खरेदी करावे लागत आहे. त्यातही दुर्मीळ रक्तगट असलेल्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नालासोपारा येथील साथिया रक्तपेढीचे अध्यक्ष विजय महाजन यांनी माहिती दिली की, सध्या वसई-विरार शहरात सुमारे १२०० ते १५०० युनिट रक्त महिन्याला लागत आहे. यात थेलेसिमिया, डायलेसिस या रुग्णांना सर्वाधिक रक्ताची गरज असते. त्याशिवाय गर्भवती महिला, रक्ताचा कर्करोग, अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रक्तपुरवठा केला जात आहे. सध्या रक्तदान शिबिरे भरविणे कठीण असल्याने रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यातही एखादे शिबीर भरविल्यास तिथे एखादा करोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण शिबीर वाया जाते. तसेच महामारीमुळे लोक रक्तदान करण्यास पुढे येत नसल्याने तुटवडय़ाची तीव्रता दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे.

महापालिकेची रक्तपेढी कागदावरच

शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या वर आहे, पण पालिकेची स्वत:ची रक्तपेढी नसल्याने गरजूंना वेळेवर रक्तपुरवठा होऊ  शकत नाही. सध्या ज्या रक्तपेढी उपलब्ध आहेत, त्या दात्याशिवाय रक्त देत नाहीत. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. वसई-विरार महापालिकेने स्वत:ची रक्तपेढी काढण्याचे योजले होते. पण हा प्रकल्प अजूनही कागदावरच राहिल्याने वसईकरांना गरजेच्या वेळी रक्तपुरवठा होत नाही. या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे आयुक्त गंगाथरण डी. यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांपासून पालिकेकडे रक्तपेढीची मागणी करत आहोत. सध्या करोना काळात इतर आजारांवर मोठे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ज्यांना रक्ताची नितांत गरज आहे, त्यांना रक्त उपलब्ध होत नसल्याने जिवाला मुकावे लागत आहेत. साथिया रक्तपेढीने पालिकेशी संलग्न रक्तपेढी सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेसमोर कित्येक वर्षांपासून ठेवला आहे. पण अजूनही त्यावर कोणतही कारवाई होत नाही.

– राजेश ढगे, रुग्णमित्र, वसई

पालिकेने स्वत:ची रक्तपेढी उभारण्यास सुरुवात केली होती. या विषयाला महासभेत मंजुरीही मिळाली होती, पण सध्या करोना वातावरणामुळे हा विषय मागे पडला.                 – प्रवीण शेट्टी, महापौर