राज्यात गेल्या काही वर्षांत निर्माण झालेला मागासलेपणा हा नेत्यांच्या बॅकलॉगमुळे झाला आहे, असे स्पष्ट मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विकासाच्या ब्ल्यू प्रिंट होत असून ती सन २०१४च्या निवडणूकीपूर्वी जाहीर करण्यात येईल. राज्यात सर्वच क्षेत्रांत निर्माण झालेला बॅकलॉग हा एक-दोन वर्षांचा विषय नाही. जनतेने ज्यांना विश्वासाने अनेक वर्षे निवडून दिले त्या नेत्यांचा हा बॅकलॉग असून तो तात्काळ कसा भरून निघेल, असा सवाल त्यांनी केला. नेत्याचा असाच ‘बॅकलॉग’ कायम राहिल्यास विदर्भाचा अनुशेषदेखील तसाच कायम राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
विदर्भाच्या मागासलेपणाबद्दल निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज निर्माण झाल्याचे मत राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  
मुंबई आमदारांच्या मारहाण प्रकरणानंतर वृत्तवाहिन्यांच्या संपादकांवरील हक्कभंगाविषयी त्यांना विचारले असता, त्यांनी वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ही लोकभावना होती, त्यात थोडाबहुत अतिरेकपणा झाला असेल, तरीदेखील ती जनभावना होती हे विसरता येणार नाही, असे स्पष्ट मत मांडले.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात वीस वर्षांनंतर लागलेल्या निकालाबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सध्याच्या पिढीला या बॉम्बस्फोटाबद्दल काही माहितीदेखील नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या बॉम्बस्फोट प्रकरणात जे देशाबाहेर आहेत त्यांना कधी आणणार, असा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारला. बॉम्बस्फोटातील कुठल्याही आरोपीला क्षमा करू नये, असे ठाम मत त्यांनी या वेळी मांडले. अभिनेता संजय दत्त यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
रतन टाटा व नितीन गडकरी यांची भेट ही वैयक्तिक होती. त्यात कुठलेही राजकारण नव्हते. संपूर्ण राज्याच्या विकासासाठी पुढील ५० वर्षांचे धोरण निश्चित करावे लागेल तरच विकास शक्य आहे, अशी सूचना त्यांनी केली. सुधाकर तांबोळी या वेळी उपस्थित होते.
‘कॉमनसेन्स’ ‘नॉट कॉमन’
नेत्यांमध्ये दूरदृष्टी नसल्याने कापूस विदर्भात टेक्सटाइल पार्क इंचलकरंजीत, मराठवाडय़ात पाण्याची बोंब असताना साखर कारखाने उघडल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांनी इंग्रजीतील म्हण सांगत राज्यातील नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.
महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना आयपीएल होणार का, हा प्रश्न कायम असल्याचे ते म्हणाले. राज्यात आयपीएल होणार असेल तर ज्या मंत्र्यांनी शाही थाटात लग्ने केली त्यांना का दरडावले, असा प्रश्न त्यांनी शरद पवारांचा उल्लेख टाळत केला.

व्यंगचित्राचे शब्द झाले
महाराष्ट्र सरकारचे कामकाज अगदी बिनडोकसारखं सुरू असल्याची टीका त्यांनी केली. जे. जे. स्कूल ऑफ ऑर्टचे डीन क्षेत्राबाहेरचे असल्याची टीका त्यांनी केली. व्यंगचित्र काढण्याचा छंद आता जोपासणे शक्य होत नाही, पण तो छंद आता शब्दातून बाहेर पडत असल्याचे ते म्हणाले. सन १९८६मध्ये मुक्त व्यंगचित्रकार म्हणून ‘लोकसत्ता’मध्ये काम केल्याची आठवण त्यांनी सांगितली.

मुख्यमंत्री प्रामाणिक
काँग्रेस नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल प्रतिक्रिया देत नसल्याचे पहिले राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चव्हाण हे प्रामाणिक माणूस असल्याचे कौतुक त्यांनी केले. त्यांना काही करण्याची इच्छा आहे, त्यांचा प्रशासकीय बाज चांगला आहे. मुख्यमंत्र्यांना येथे ना काही कमवायचे आहे, ना काही गमवायचे आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.