मुंबई महानगरपालिका सभागृहात विरोधी पक्षनेत्यांचा गौप्यस्फोट

वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणीनंतर जकात बंद झाली आणि मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनला. मात्र बडय़ा कंपन्या आणि विकासकांबरोबर अन्य १०० जणांनी तब्बल ४५०० कोटी रुपये मालमत्ता कर बुडविला असून त्यामध्ये भारत डायमंड, कोहिनूर मॉल, रिलायन्स आदींचा समावेश असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सोमवारी पालिका सभागहात केला.

पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्याकडे सादर केला होता. गेल्या आठवडय़ात रमेश कोरगावकर यांनी आगामी वर्षांचा अर्थसंकल्प पालिका सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पावर सोमवारी पालिका सभागृहात चर्चा सुरू झाली. आपल्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये रवी राजा यांनी वरील गौप्यस्फोट केला.

प्रशासनाने चालू आर्थिक वर्षांमध्ये मालमत्ता करापोटी ५४०१ कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष निश्चित केले होते. मात्र ५ मार्चपर्यंत पालिकेला ३७८६ कोटी ८५ लाख रुपये कर वसूल करण्यात आला असून उर्वरित १६१५ कोटी ६४ लाख रुपये १८ दिवसांमध्ये कसे वसूल करण्यात येणार, असा सवाल रवी राजा यांनी केला.

मालमत्ता कराची तब्बल ४५०० कोटी रुपयांची थकबाकी वादामुळे वसूल होऊ शकलेली नाही. वादात असलेली ही रक्कम वाढतच आहे. या रकमेची वसुली करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आलेले नाहीत, ही बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर जकात कर बंद करण्यात आला. त्यामुळे जकात कर विभागातील तब्बल ३५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची करनिर्धारण व संकलन विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी ३५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करुनही प्रशासनाला चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात निश्चित केलेले कराच्या वसुलीचे उद्दीष्ट गाठता आलेले नाही, अशी खंतही रवी राजा यांनी व्यक्त केली.