News Flash

शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी शक्य ते सर्व करु; राज ठाकरेंच्या भेटीनंतर लाड यांचं विधान

मनसे-भाजपा युतीबद्दल चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

संग्रहित छायाचित्र

मुंबई महापालिका निवडणुकींना अवकाश असला, तरी पडद्यामागे राजकीय घडामोडी वेगानं घडताना दिसत आहे. शिवसेना दूर गेल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजपा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तुळातील मानले जाणार आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेना इशारा देणारं विधान केलं.

भाजपाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. प्रसाद लाड हे जवळपास पाऊण तास राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर होते. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. भेटीनंतर कृष्णकुंजमधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचा पक्षाचा निर्धार आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही वैयक्तिक होती, असं त्यांनी सांगितलं. माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध आहेत, असं लाड म्हणाले. मात्र त्याचबरोबर “शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी शक्य ते सर्व करु,” म्हणत लाड यांनी शिवसेनेला इशाराही दिला.

लाड यांनी राजकीय भेट नसल्याचं सांगितलं असलं, तरी येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. युती झाली नाही, तरी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यताही व्यक्त केली जात आहे. कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि मनसेसमोर प्रामुख्याने शिवसेनेचं आव्हान असणार आहे. शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपा-मनसेची रणनीती असू शकते.

मनसे-भाजपा युतीबद्दल चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून पत्रकारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना छेडलं होतं. त्यावर “मी वारंवार याबद्दलची भूमिका मांडली आहे. राज ठाकरे असो वा मनसे यांच्याबद्दल आदराने म्हटलेलं आहे. मी एक वाक्य दरवेळी म्हटलं आहे की, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हटलेलं नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्यानं भांडण्याचं कारण नाही. कायदाच आहे. शेवटी तुमचा (मनसे) कशाला विरोध आहे? परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे का? मग देशातल्या सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणं तोही संघर्ष करणं आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. मी राज ठाकरे यांची स्तुती करता करता, मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,” असं चंद्रकांत पाटील स्पष्ट केलं. त्याचबरोबर “युतीबद्दल अजून तरी विषय आलेला नाही. मी वारंवार तुमच्या माध्यमातूनच मांडतोय. ज्यांचा त्यांच्यासोबत संवाद आहेत, ते लोक चर्चा करतील,” युतीसाठीच्या चर्चेचे मार्ग खुले असल्याचे संकेतही पाटील यांनी दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 2:12 pm

Web Title: bmc election bjp mns alliance prasad lad met raj thackeray bmh 90
Next Stories
1 आता तुरूंग पर्यटन! २६ जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रारंभ
2 शिवसेनेच्या स्वाभिमानावर फडणवीसांनी ठेवलं बोट; बाळासाहेबांचा व्हिडीओ केला ट्विट
3 राजकीय जुगलबंदी! ठाकरे बंधूंसह, पवार, फडणवीस आज एकाच मंचावर
Just Now!
X