News Flash

मोठी बातमी…राज्यातल्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द!

राज्यशासनाच्या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

‘करोनापूर्व काळा’तील संग्रहित छायाचित्र

राज्यातल्या बारावीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा झाल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितलं की, “शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे”.

आता या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती असंही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांनी राज्याच्या अनलॉकबद्दलही माहिती दिली.

आणखी वाचा- Corona Impact: ‘या’ राज्यांनी रद्द केल्या दहावी-बारावीच्या परीक्षा

करोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यापाठोपाठ ‘सीआयएससीई’नेही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता हे सर्वात जास्त महत्त्वाचं असल्याचं सांगत उत्तर प्रदेश सरकारनेही या शैक्षणिक वर्षातल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे.

केंद्राच्या निर्णयानंतर लागलीच गुजरात बोर्डाने देखील राज्यातल्या १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्याच्या फक्त २४ तास आधी गुजरात बोर्डाने बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार १ जुलैपासून बारावी पुनर्परीक्षा आणि बाह्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर गुजरात बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 4:08 pm

Web Title: board exams in maharashtra 12 board exams cancelled in maharashta board exams vsk 98
Next Stories
1 “नाथाभाऊ अजूनही आमचे पालकच,” चंद्रकांत पाटलांचं एकनाथ खडसेंबद्दल मोठं विधान
2 पूल वाहून गेल्याने सातारा महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
3 गृहनिर्माण प्रधान सचिवपदी म्हैसकर; तर MMRDA महानगर आयुक्तपदी श्रीनिवास यांची नियुक्ती
Just Now!
X