पालघरच्या सातपाटी भागात असलेल्या दिव्य लक्ष्मी या मासेमारी नौकेला ओएनजीसी नौकेच्या सुरक्षा गस्तीसाठी आलेल्या श्रद्धा सागर या नौकेने धडक दिली. या अपघातातून दिव्य लक्ष्मी नौकेवरचे 13 खलाशी थोडक्यात बचावले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दिव्य लक्ष्मी बोटीचे मोठे नुकसान झाले आहे.

दुपारी एकच्या सुमारास पंकज सुभाष मात्रे यांच्या मालकीची दिव्य लक्ष्मी ही नौका मासेमारीसाठी 13 खलाशांना घेऊन मासेमारीसाठी निघाली होती. सातपाटीपासून दहा नॉटिकल मैलावर ही नौका पोचली असता श्रद्धा सागर या ओएनजीसीच्या सुरक्षा गस्ती नौकेने तिला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बोटीतील दोन ते तीन खलाशी बाहेर फेकले गेले. मात्र बोटीच्या इतर मच्छीमारांनी प्रसंगावधान राखत या बोटीतील अन्य मच्छीमारांना वाचवले. दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.

ओएनजीसीच्या पोलर मर्क्युस या महाकाय जहाजाने गेल्या काही दिवसांपूर्वी तेल व नैसर्गिक वायू साठ्याचे स्रोत शोधण्यासाठी पालघरच्या जिल्हा हद्दीतील समुद्रात सर्वेक्षण सुरू आहे.या जहाजासाठी सुरक्षा म्हणून या इतर मासेमारी नौकांचा सुरक्षा गस्ती नौका म्हणून वापर करण्यात येत आहे.याच सुरक्षा गस्ती नौकेतील लक्ष्मी सागर ही धडक देणारी नौका आहे.