08 March 2021

News Flash

बोटबुडीनंतर प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

खोल समुद्रात फायबर बनावटीच्या बोटी चालवणे सुरक्षित आहे का

|| हर्षद कशाळकर

अरबी समुद्रातील शिवस्मारकच्या पायाभरणीला जाणारी बोट गेल्या बुधवारी बुडाल्यानंतर जलवाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मेरीटाईम बोर्डाकडून खासगी आणि सार्वजनिक जलवाहतूक बोटींमधील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मुंबई ते मांडवा, मुंबई ते जेएनपीटी, मुंबई ते एलिफंटा आणि रेवस ते भाऊचा धक्का या मार्गावर जलप्रवासी वाहतूक केली जाते. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात. मुंबई ते मांडवा हा जलमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सर्वाधिक गजबजलेला मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर तीन सार्वजनिक बोटींच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. त्यातून दररोज तीन ते साडेतीन हजार तर शनिवार आणि रविवारी पाच ते सात हजार प्रवाशांची वाहतूक होते. याशिवाय अनेक खासगी स्पीड बोटी या मार्गावर सेवेत असतात. मात्र बुधवारी झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

या अपघातानंतर सागरी सुरक्षेतील काही त्रुटी प्रकर्षांने समोर आल्या आहेत. शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभाला जाण्यासाठी खासगी बोटींचा वापर करण्यात आला. त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरण्यात आले. बोटीचा वेग नियंत्रणात नव्हता. बोटीमध्ये लाइफ जॅकेट्स अपुरे होते. अपघातानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी ठरल्या, अपघातानंतरही बराच वेळ तटरक्षक दल आणि पोलिसांच्या गस्ती नौका घटनास्थळी पोहोचू शकल्या नाहीत. आमदार जयंत पाटील यांची खासगी बोट वेळेत दाखल झाली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.

खोल समुद्रात फायबर बनावटीच्या बोटी चालवणे सुरक्षित आहे का, हे तपासणे आता गरजेचे आहे. कारण अल्युमिनियम बनावटीच्या बोटी समुद्रात चालवण्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पीड बोटींना प्रवाशी वाहतूक करण्याचा परवानाच दिलेला नाही. मात्र तरीही मांडवा ते गेट वे दरम्यान या बोटींमधून बेकायदा प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्याचे तिकीटही प्रवाशांना दिले जात नाही.

खासगी स्पीड बोटींप्रमाणेच प्रवासी जलवाहतूक करणाऱ्या बोटी जलवाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळत नाहीत. माडंवा ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान अजंठा, मालदार आणि पीएनपी अशा तीन कंपन्याच्या माध्यमातून जलप्रवासी वाहतूक केली जाते. पीएनपीचा अपवाद वगळता बऱ्याचदा इतर कंपन्यांकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. त्याकडे मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी कानाडोळा करतात. या बोटींमध्ये पुरेसे लाइफ जॅकेट्सही उपलब्ध नसतात. त्यामुळे या बोटींना अपघात झाला तर मोठी दुर्घटना घडू शकते. गेट वे ऑफ इंडियाजवळ लागणाऱ्या बोटींची संख्या अधिक असल्याने प्रवाशांना चढता- उतरताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेणे गरजेचे बनले आहे.

खासगी स्पीड बोटींना प्रवासी वाहतूक करण्यास मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही काही स्पीड बोटींमधून प्रवाशांची वाहतूक करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.  – अनिल शिंदे, बंदर निरीक्षक, मेटीटाईम बोर्ड, मांडवा

जलप्रवासी बोटींमधून वाहतूक करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा विमा असावा अशी आम्ही सातत्याने मागणी करत आहोत. मात्र बोटीचा विमा असल्याचे सांगत मूळ मागणीला बगल दिली जात आहे. याशिवाय सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतुकीकडे मेरीटाईम बोर्ड दुर्लक्ष करत आहे. यासंदर्भात वांरवार पाठपुरावा करूनही मेरीटाईम बोर्डाने त्याची दखल घेतली नाही.   – दिलीप जोग, अध्यक्ष वेल्फेअर असोसिएशन फॉर पॅसेंजर ऑफ कोकण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 1:18 am

Web Title: boat accident in mumbai
Next Stories
1 मेळघाटात सात महिन्यांत २७६ बालमृत्यू
2 निवडणुकांचे वेध अन् मतदारांसाठी तीर्थयात्रा
3 दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास
Just Now!
X