सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग संगम खाडीपात्रात नौकाविहार करणाऱ्या पर्यटकांची नौका उलटून घडलेल्या दुर्घटनेत, एका वृद्ध महिलेचा  मृत्यू झाला आहे. तर आठ जणांना वाचवण्यात यश आले आहे. माया मोरे (६०) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव असून त्या कल्याणमधील आंबिवली येथील त्या रहिवासी होत्या.  आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या ठिकाणी नौकाविहार करण्यासाठी कल्याण ठाणे येथील पर्यटक आले होते. हे पर्यटक नौकाविहार करत असताना सोसाट्याचा वारा आल्याने नौका कलंडून ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. नौका उलटल्याचे लक्षात येताच स्थानिक मच्छिमारांनी तातडीने धाव घेत सर्व पर्यटकांना बाहेर काढले. यानंतर त्यांना मालवणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा अगोदरच माया मोरे यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

खरेतर कालच हवामान खात्याकडून मुंबईसह कोकण किनारपट्टी व उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अरबी समुद्रामध्ये आगामी २४ तासांत ‘पवन’ आणि ‘अम्फन’ ही दोन चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय, चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. यादरम्यान वाऱ्याचा वेग हा प्रतितास ४० ते ५० किलोमीटर राहणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते.