अलिबाग तालुक्यात करोनाबाधितांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. तालुक्यातील बोडणी हे गाव करोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. तीन दिवसात गावात ५५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने गावातील प्रसार रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण आवश्यक आहे.

अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे १९ जुलैला १७, २० जुलैला २० तर २१ जुलैला १८ करोनाबाधित आढळून आले आहेत. उरण तालुक्यातील करंजा नंतर बोडणी गावात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गावात मोठ्या प्रमाणात समुह संसर्ग झाल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे गावात व्यापक प्रमाणात शोध, तपासणी आणि उपचार मोहिम राबवावी लागणार आहे.

आणखी वाचा- ‘बनवाबनवी थांबवा आणि कृती करा’, किरीट सोमय्यांचे राजेश टोपे यांना पत्र

तालुक्यात मंगळवारी ४४ नवे रुग्ण आढळून आले. यात अलिबाग शहर, चेंढरे, चोंढी, बोडणी, थेरोंडा, कार्लेखिंड, सागाव, चिंचोटी, झिराड मधील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ७३९ वर पोहोचली आहे. यातील ३५२ जणं करोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर १९ जणांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला आहे. ३६८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांनाही करोनाची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आले. या दोघांची त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलन करण्याचे काम सुरु असल्याचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगीतले.

आणखी वाचा- औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्या ११ हजार ४२० वर

बोडणीत १०० टक्के लोकांचे स्क्रीनिंग होणार – जिल्हाधिकारी
अलिबाग तालुक्यातील बोडणी गावात ५५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गावातील १०० टक्के लोकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांची करोना चाचणी करणे, बाधित रुग्णांवर उपचार करणे सुरु झाले आहे. या काळात गावात कडक निर्बंध लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.