यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रोशन भीमराव ढोकणे (वय-२७), (रा. पिंपळगाव काळे, ता. नेर) या तरुणाचा मृतदेह मंगळवारी रात्री बेपत्ता झाला. रोशन भीमराव ढोकणे याच्या मृतदेहावर मारोती दासू जाधव या नावाने ‘डेथ लेबल’ लागून मृतदेह वॉर्डातून शवविच्छेदन गृहात नेण्यात आला. मृत मारोती जाधव यांचा मुलगा विनोद जाधव याची मन:स्थिती बरी नसल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याच्यावेळी त्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे मारोती ऐवजी रोशनवर कोविड नियमांप्रमाणे यवतमाळ नगर परिषदेमार्फत २१ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने आज (शनिवार) स्पष्ट केले.

तीन दिवस रोशनच्या मृतदेहासाठी धावपळ करूनही महाविद्यालय प्रशासन सहकार्य करीत नसल्याने रोशनच्या कुटुंबियांनी आज सकाळपासून महाविद्यालाच्या आवारात उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेत, या प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने चौकशीअंती वस्तुस्थिती कुटुंबीयांना सांगितली. रोशनच्या मृतदेहावर चुकून का होईना पण अंत्यसंस्कार झाल्याचे सांगण्यात आल्यानंतर ढोकणे कुटुंबियांनी सायंकाळी उपोषण मागे घेतले. या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या चार सदस्यीय समितीचा अंतिम अहवाल मंगळवारपर्यंत येणार असून त्यांनतर संबंधित दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मृताच्या कुटुंबियांना दिले आहे.

धक्कादायक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रुग्णाचा मृतदेह गहाळ!

ज्या व्यक्तीच्या नावे रोशनवर चुकून अंत्यसंस्कार झाले ते मारोती जाधव करोनाबाधित होते. शवविच्छेदन गृहात आणखी एक पुरुष मृतदेह ठेवून होता. मारोती जाधव समजून रोशनवर अंत्यसंस्कार करणाऱ्या जाधव यांच्या नातेवाईकांनी आज शनिवारी शवविच्छेदन गृहातील मृतदेहाची ओळख पटवून तो मारोती जाधव यांचाच मृतदेह असल्याची खात्री केली. त्यानंतर मारोती जाधव यांच्या मृतदेहावर नगर परिषदेमार्फत आज पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. ही संपूर्ण वस्तुस्थिती रोशन ढोकणे यांच्या कुटुंबियांना सांगण्यात येवून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने केली. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल मंगळवापर्यंत सादर होण्याची शक्यता असून त्यानंतर संबंधित दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. झालेला प्रकार दुर्दैवी असून असा प्रकार पुन्हा घडू नये, असेही ते म्हणाले.