ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोहोळ तालुक्यातील नागझरी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या एका ६८ वर्षांच्या शेतक ऱ्याच्या मृतदेहाचा सांगाडा तब्बल ४० दिवसांनंतर सापडला.

निवृत्ती रंगनाथ ताटे (रा. मुंगशी, ता. मोहोळ) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ताटे कुटुंबीयांची मोहोळ तालुक्यातील देगाव वाळूज येथे नागझरी नदीकाठी शेती आहे. १४ व १५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली होती. त्यात नागझरी नदीला पूर आला होता. त्या वेळी नदीचे पात्र ओलांडत असताना निवृत्ती ताटे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. नंतर त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान, देगावपासून जवळच असलेल्या कुमार कादे यांच्या शेतात एक मानवी शरीराचा सांगाडा सापडला. मोहोळ पोलिसांनी त्याची नोंद करून तपास हाती घेतला. पुरात वाहून गेलेले निवृत्ती ताटे हे वारकरी सांप्रदायाचे पाईक होते. सापडलेल्या मानवी सांगाडय़ावर कपडे व गळ्यात तुळशीची माळ होती. यावरून हा मृतदेह निवृत्ती ताटे यांचा असल्याची खात्री पटवणे सोपे गेले.