बीड : नगरपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या टोलवा टोलवीत करोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास विलंब होत असल्याने संतप्त नातेवाइकांनी मृतदेह नगरपंचायतच्या दारात आणून ठेवल्याचा प्रकार आष्टी येथे घडला. दोन तासानंतर प्रशासनाने त्या महिलेचा अंत्यविधी केला. दरम्यान प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे मृतदेहाची अवहेलना झाल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.

बीड जिल्ह्यातील केरुळ (ता.आष्टी) येथील ६५ वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रतिजन चाचणीत महिला करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अध्र्या तासाने तिचा मृत्यू झाला. मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाने नगरपंचायत प्रशासनाला कळविले. शुक्रवारी सायंकाळी नातेवाइकांसह रुग्णालयाचे कर्मचारी मृतदेह घेऊन पिंपळेश्वर स्मशानभूमीकडे  रवाना झाले. मात्र तिथे नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी अंत्यविधीसाठी सरपण आणून निघून गेले होते. नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकारी दोन तास त्याठिकाणी थांबले. मात्र नगरपंचायतचे कोणीच न फिरकल्याने संतप्त नातेवाइकांनी रात्री मृतदेह नगरपंचायतच्या दारात आणून ठेवला. अखेर रात्री उशिरा नगरपंचायत प्रशासनाने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.