गर्भवती स्त्रीच्या गर्भामध्ये स्त्री अर्भक असेल तर ते पुरूषामध्ये रूपांतर करून देईन, असा दावा करणाऱ्या भोंदूबाबा व बोगस डॉक्टरचा मंगळवारी भाकप, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी एस.डी. कुंभार (वय ६०) या व्यक्तीला अटक केली असून त्याच्या विरोधात जादूटोणाप्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम १० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कुंभार याच्या कथित दवाखान्यातून पोलिसांनी पाच पोती औषधे जप्त केली. कोल्हापूर जिल्ह्य़ात या कायद्यांतर्गत दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. आरोपी कुंभार याने आपण सदर प्रकारच्या कृत्यासह मुलगा होण्यासाठी औषध देत असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.    
जुना कळंबा नाक्याजवळ माने-मोरे नगर आहे. या भागामध्ये एस.डी.कुंभार हा भोंदूबाबा व बोगस डॉक्टर राहतो. तो गर्भातील स्त्री अपत्याचे पुरूष अपत्यामध्ये बदल घडवून आणण्याचा दावा करतो. त्यासाठी तो १०५१ रूपये घेऊन औषधे देत होता. ही माहिती भाकपचे कार्यकर्ते सतिशचंद्र कांबळे यांना समजली.त्यांनी कुंभार याच्या घरी जाऊन वस्तुस्थितीची सत्यता पडताळून पाहिली. यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांना याची माहिती देऊन कुंभार याच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. डॉ.शर्मा यांनी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ढोणे यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.     
त्यानुसार मंगळवारी कांबळे व सहकारी राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आले. तेथे आवाज ध्वनिमुद्रित करण्याची यंत्रणा व छापा टाकण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य एकत्रित करण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सतिशचंद्र कांबळे व त्यांच्या पत्नी स्नेहल हे दोघेजण रूग्ण असण्याचा बहाणा करून कुंभार यास भेटले. त्यांच्यासोबत पंच म्हणून आलेले सुशीला यादव, अनिल चव्हाण, विजयश्री कांबळे, दिलदार मुजावर, कृष्णात कोरे, सुनिता अमृतसागर आदी कार्यकर्ते व पोलीसही होते. 
कांबळे यांनी आपली अडचण कथन केल्यानंतर कुंभार याने त्यांना १०५१ रूपये घेऊन एका डबीतून गोळ्या व चिठ्ठी दिली. औषधाचा वापर कसा करायचा याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये करण्यात आला होता. कुंभार याने कांबळे दाम्पत्याला औषध दिल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. या वेळी तेथे आणखी कांही रूग्ण उपस्थित होते. कांबळे हे कुंभार याला भेटण्यापूर्वी आणखी वीस रूग्ण भेटलेले होते. १९८२ सालापासून आपण हा प्रकार करत असल्याची कबुली कुंभार याने पोलिसांना दिली.