गोंदिया : उच्चशिक्षित मुलीला खुद्द तिच्या मैत्रिणीनेच भावनेत अडकवून तिच्या मरण पावलेल्या आईशी बोलणी घालून देतो म्हणून भोंदूबाबाकडून अघोरी पूजा करण्यास सांगितले. मुलीला याबाबत शंका येताच तिने पवनी पोलिसांना याची माहिती दिली. अघोरी पूजा करताना भोंदूबाबा व त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली. ही पूजा करण्यासाठी भोंदूबाबाने ३१ हजारांची मागणी केली होती. दोन्ही आरोपींना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी तरुणी (१९) हिने शिकवणी वर्गात मैत्री झालेल्या आपल्या मैत्रिणीला (१९) हिला भावनेत अडकवून ‘तुझी आई मरण पावली आहे. तिला जादूटोणा करून मारण्यात आले होते. तुझ्या भावाला सुद्धा अशाच पद्धतीने मारले जाणार आहे. हे सगळे थांबवायचे असेल तर तुला एक पूजा करावी लागेल. ही पूजा करण्यासाठी माझ्या ओळखीचा जितू अनिल मेश्राम (रा. राजनांदगाव) नावाचा महाराज आहे. तू त्याच्याकडून पूजा करून स्वत:चे जीवन व भावाचे जीवन वाचव’, अशी बतावणी करून मी सांगत असलेले खोटे वाटत असेल तर पूजा करून तुझ्या मृत आईला तुझ्याची प्रत्यक्ष बोलायला लावण्यास महाराज सक्षम असल्याचे सांगितले.

फिर्यादीने शिकवणी वर्गातील अन्य मैत्रिणींकडून याबाबत अधिक माहिती घेतली. ती अशाच रितीने भावनेत अडकवून जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक करून आर्थिक लूटमार करीत असल्याचे माहीत झाले. हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून त्यांच्या मदतीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. पवनी पोलिसांनी सापळा रचून गोसेखुर्द धरणाच्या कालव्यावर खापरी जंगल शिवारात अघोरी पूजा करताना भोंदूबाबा जितू अनिल मेश्राम  व त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून पूजेचे साहित्य, घुबडाचे पाय, हड्डीची माळ, कोंबडा, देशी दारूची बॉटल, हवनाचे साहित्य जप्त करून जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३चे कलम ३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.