लाखो रुपये उकळून बोगस पीएच.डी. बहाल करण्याच्या प्रकरणाने देशाच्या शिक्षण क्षेत्रात बदनाम झालेल्या मेघालयातील चंद्रमोहन झा विद्यापीठाचे अनेक लाभार्थी प्राध्यापक विदर्भात असून उच्च शिक्षण खात्याच्या सहसंचालकांनी सर्व महाविद्यालयांना एक पत्र पाठवून अशा ‘बोगस’ प्राध्यापकांची नावे कळवण्याचे निर्देश दिल्याने शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मेघालयातील शिलाँगमध्ये असलेले हे विद्यापीठ पैसे घेऊन केलेल्या बोगस पीएच.डी. वाटपामुळे सध्या देशभरात चर्चेत आले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तसमूहाने या विद्यापीठातील गैरकारभाराचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी या विद्यापीठातील अनेक उच्चपदस्थांविरूद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केल्याने या विद्यापीठातून पीएच.डी. मिळवणाऱ्या शेकडो प्राध्यापकांचे धाबे दणाणले आहे. या पाश्र्वभूमीवर या विद्यापीठातून पीएच.डी. मिळवणाऱ्या प्राध्यापकांची संख्या विदर्भातसुद्धा लक्षणीय असल्याची माहिती समोर आली आहे.
बोगस पीएच.डी. प्रकरण उघडकीस आल्यानंतर चंद्रमोहन झा विद्यापीठाला मेघालय पोलिसांनी सील ठोकले आहे.पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्हय़ातील सुमारे २५ ते ३० प्राध्यापकांनी या विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवल्याचे शैक्षणिक वर्तुळातील जाणकारांचे म्हणणे आहे. शैक्षणिक काम करताना रितसर पीएच.डी. मिळवायची असेल तर प्राध्यापकांना अधिकृतपणे रजा मिळते. या रजेच्या काळाचे वेतन देण्याची तरतूदसुद्धा विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. या प्राध्यापकांनी मात्र रजा न घेता या विद्यापीठात वशिला लावून पीएच.डी. केल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाच्या नियमानुसार आता प्राध्यापकांच्या शैक्षणिक अर्हतेत नेट, सेट तसेच पीएच.डी. अनिवार्य करण्यात आली आहे. त्याशिवाय बढती व वेतनाचे इतर लाभ मिळणार नाही अशी अट सुद्धा टाकण्यात आली आहे. यातून सुटका करून घेण्यासाठीच प्राध्यापकांनी या विद्यापीठातून पीएच.डी. मिळवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
चंद्रपूर जिल्हय़ातील वरोरा, पोंभुर्णा, बल्लारपूर व चंद्रपुरातील महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या १० प्राध्यापकांनी या विद्यापीठाची पीएच.डी. मिळवल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पीएच.डी.च्या अभ्यासाच्या काळात हे प्राध्यापक कधीही शिलाँगला गेलेले नव्हते. त्यामुळे या प्राध्यापकांनी मिळवलेली ‘डॉक्टरेट’ बोगस असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शैक्षणिक वर्तुळात अशा प्राध्यापकांच्या नावांची चर्चा सुरू झाल्यामुळे तसेच या विद्यापीठाविषयीच्या गैरकारभाराची माहिती वृत्तपत्रांमधून समोर येत असल्याने अखेर उच्च शिक्षण खात्याने आता कारवाईला सुरूवात केली आहे. या खात्याचे नागपूर विभागाचे सहसंचालक डी. बी. पाटील यांनी सर्व महाविद्यालयांना एक पत्र पाठवले असून त्यात या विद्यापीठातून पीएचडी मिळवणाऱ्या प्राध्यापकांची नावे तातडीने कळवण्याचे निर्देश प्राचार्याना दिले आहेत. यासंदर्भात पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी असे पत्र मिळाल्याचे सांगितले. या पत्राला तातडीने उत्तर दिले जाईल असे ते म्हणाले. उच्च शिक्षण खात्याच्या या पवित्र्यामुळे शैक्षणिक वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. उच्च शिक्षण खात्याकडे माहिती गोळा झाल्यानंतर या प्राध्यापकांवर पदावनतीची कारवाई केली जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.