नाशिकच्या आदिवासी विकास विभागाचे बनावट संकेतस्थळ व अपर आयुक्त हुद्द्याचे बनावट शिक्के, स्वाक्षरीचा वापर करून बेरोजगार तरुणांना नोकरीत घेण्याचे खोटे नियुक्ती पत्र देऊन त्यांची फसवणुक केल्या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली.
शेकडो बेरोजगार तरुणांना आतापर्यंत फसवले गेले असून यामागे नऊ संशयितांचा समावेश आहे. युवकांना नोकरीच्या बदल्यात फसवून घेतलेली रक्कम ही कोट्यवधींच्या आसपास आहे. पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
पोलिसांनी शनिवारी हेमंत सीताराम पाटील (३१, देवपूर, धुळे), सुरेश गोकुळ पाटील (३२, रा. देवपूर, धुळे), तुकाराम रामसिंग पवार (५६, रा. तामसवाडी, ता. पारोळा,जि. जळगाव) व उदयनाथ शाम नारायण सिंग (रा. भाइंदर, ठाणे) यांना अटक केली आहे.
हेमंत पाटील हा या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असून तो हा गुन्हा करताना अमित लोखंडे असे बनावट नाव वापरत होता. या नावाचे त्याने आधार कार्ड तसेच आदिवासी विभागाचे ओळखपत्रही बनवले होते.
आदिवासी विकास विभागात प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवत चाळीसगावमधील पिंपळवाड येथे एका बेरोजगारास साडेदहा लाख रुपये मागवून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून आयुक्तांनी पोलीस उपआयुक्त दत्तात्रय कराळे व लक्ष्मीकांत पाटील यांना तपासाचे आदेश दिले.
त्यांनी गुन्हे शाखेची विविध चार पथके तयार केली व त्यांना नाशिक, धुळे, मुंबई, पुणे व जळगाव या ठिकाणी पाठवले. या कारवाईत संशयीत चारही आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींकडील बनावट संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी वापरलेला संगणक, खोटे पत्र बनविण्याचे साहित्य, शिक्के व नियुक्ती पत्र अशी बनावट कागदपत्रे, एक चारचाकी वाहन, मोबाईल व साहित्य पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 7:58 am