सुर्या नदीत स्टंटबाजी करताना बंधाऱ्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्टाइल आणि स्टंट तरुणाईला वेड लावत असून असले स्टंट तरूणांच्या जिवावर बेतत आहे. असाच प्रकार बोईसर पुर्वेला असलेल्या सुर्यानदी पात्रात घडला असून नदीच्या पाण्यात स्टंट करताना शुक्रवारी दुपारच्या वेळेस एक तरूणाचा मृत्यू झाला असून, अन्य एकाला स्थानिकांनी वाचवले आहे.

बोईसर पुर्वेला गुंदले गावाच्या हद्दीत असलेल्या सुर्यानदी पात्रात शुक्रवारी दुपारी संजित कनोजिया (वय- १७) हा आपल्या तीन मित्रांसोबत सुर्या नदीत पोहण्यासाठी आला होता. तिघेही नदीत पोहत असताना बंधाऱ्यावरून उड्या मारत स्टंटबाजी करत होते.  दरम्यान यातील दोघे जण बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस पडल्याने बुडू लागले होते. पाण्याबाहेर असलेल्या मित्राने आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी एका तरुणाला वाचवले परंतु संजित कनोजिया याचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांकडून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, तो मान येथील ओस्तवाल वंडर सिटीचा रहिवासी होता.

जुलै महिन्यात सुर्या नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता.दरम्यान सुर्या नदी पात्र बंधाऱ्याच्या भागात धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे सुर्या नदी पात्रात पोहण्यासाठी येणाऱ्यांना मनाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.