लोकसत्ता वार्ताहर

बोईसर :  तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाबाबत तक्रार करणाऱ्या कोलवडे ग्रामपंचायतीने घूमजाव करण्याचा प्रकार केला आहे. आधी प्रदूषणबाबतच्या तक्रार केल्यानंतर  कारखान्यांद्वारे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणारे काम सुरू नसल्याचा खुलासा दुसऱ्या पत्रात  केला आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना वाचविण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप ग्रामपंचायतीवर होत आहे.

औद्योगिक क्षेत्रातील राजकीय कारखान्यातून निघणारा घनकचरा औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या  कोलवडे येथील शेतजमिनीत टाकला जातो.  तसेच प्लास्टिक पिंप येथे धुतले जातात. यातून निघणारे घातक रसायन नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याने होणाऱ्या प्रदूषणाबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये २९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार कोलवडे ग्रामपंचायतीच्या समितीने २ नोव्हेंबर रोजी प्रदूषण होत असलेल्या जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. ग्रामपंचायतीने तसेच प्रदूषण विभागाने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे या वेळी निदर्शनास आले होते.

यामुळे पर्यावरणाला धोका पोचण्याची शक्यता असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांविरुद्ध तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने ४ नोव्हेंबर रोजी मंडळाकडे केली होती. याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याच्या महिनाभरानंतर या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी भेट दिली असता सध्या त्या शेती जागेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू नसल्याचे पत्र ८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीने कोलवडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर-२चे उपप्रादेशिक अधिकारी यांना पत्र  दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात भंगार व रसायन माफियांचे प्रदूषण सुरूच असताना ग्रामपंचायतीने असे पत्र कसे दिले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर-२चे उपप्रादेशिक अधिकारी दीपक बनसोड यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार ग्रामपंचायतीची आता नाही, या ठिकाणी सुरू असलेले प्लास्टिक धुण्याचे काम बंद असल्याचे उत्तर देत प्रकरणातून नामानिराळे होण्याचा प्रयत्न केला.  विधीमंडळाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी दीपक बनसोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बातमी छापू नका असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांना आपली प्रतिक्रिया काय हे पुन्हा विचारले असता ४ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली असता एक गोदाम सुरू होते व दोन भंगार गोदाम बंद असल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे ग्रामपंचायतीने दिलेले पत्र व त्यात उल्लेख असलेला मजकूर खोटा असल्याचा एकप्रकारे खुलासा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत आहे. कोलवडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन मोकाशी यांना संपर्क व मोबाइल वर संदेश पाठवूनदेखील त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. तसेच दुपारनंतर पुन्हा  संपर्क साधला असता दूरध्वनी बंद होता.