पुणे-नाशिक महामार्गावर संमगनेरनजीक बोटा येथे झालेल्या बोलेरो व ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जबर जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर संगमनेर येथे तर उर्वरित जखमींवर पुण्यात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.
इगतपुरी येथील रहिवासी असलेली वाजे व पडवळे ही दोन आदिवासी कुटुंबे बोलेरोतून पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, जेजुरी येथून देवदर्शन घेऊन सोमवारी मध्यरात्री इगतपुरीकडे परतत होते. त्यांच्या वाहनाला बोटा गावच्या शिवारात हॉटेल कामतसमोर पहाटे पावणेतीनच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात भैरू वामन पडवळे (६०), काळू भैरू पडवळे (२५), मुली सरिता (५) व आशा (८), पांडुरंग शांताराम वाजे (३५), रोहिणी राजाराम वाजे (३) व वनिता जयराम वाजे (२५) हे सात जण ठार झाले. तर राजाराम बळवंत वाजे, संकेत राजाराम वाजे, विशाल पांडुरंग वाजे, बबलू पांडुरंग वाजे, अश्विनी पांडुरंग वाजे, गोरख राणू वाजे (चालक), मंगेश बाळकृष्ण पडवळे, देवीदास बाळकृष्ण पडवळे व लक्ष्मीबाई बाळकृष्ण पडवळे हे गंभीर जखमी झाले. राजाराम वाजे व गोरख वाजे यांना पुणे येथे हलविण्यात आले आहे.
अपघातातील जखमी व ठार झालेले सर्व जण परदेशवाडी, खेडभैरव (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत. अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त वाजे व पडवळे या दोन कुटुंबांतील १६ सदस्यांत सहा लहान बालकांचा समावेश होता. त्यापैकी तीन बालकांचा मृत्यू झाला. तर अन्य मृतांत तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. जखमींमध्ये चार मुले, दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत तांबे यांनी दिली. तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात अपघातासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.