प्रबोध देशपांडे

आस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांमागे यावर्षीही विविध अडचणींचा ससेमिरा कायम आहे. पश्चिम विदर्भात पाऊस चांगला झाल्यामुळे पिके बहरली असताना त्यावर किडींचे आक्रमण झाले, तर ते रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी तर  विषबाधेचा धोका अशा संकटाच्या गर्तेत शेतकरी वर्ग अडकला आहे. व्यापक जनजागृतीनंतरही निष्काळजीपणा व ठेका पद्धतीमुळे कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होण्याच्या घटनांचा आलेख चढताच आहे.

पिकांवर होणाऱ्या विविध किडींच्या आक्रमणामुळे उत्पादनात मोठी घट होते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रामुख्याने कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. हे कीटकनाशके शेतकऱ्यांच्या जिवासाठी धोकादायक ठरत आहेत. सर्वप्रथम २०१७ मध्ये कीटकनाशकांमुळे पश्चिम विदर्भात मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा होऊन जीवितहानी झाली होती. त्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने व्यापक जनजागृती राबविली. गतवर्षी विषबाधा होण्याच्या प्रमाणावर आळा बसविण्यात यश आले. यावर्षी पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्य़ांमध्ये चांगला पाऊस झाला. पिकांची चांगली वाढ झाली आहे. कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीने पुन्हा एकदा आक्रमण केले. याशिवाय इतरही चार ते पाच प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव विविध पिकांवर आढळून आला. त्यावर नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर सुरू आहे. कीटकनाशकाच्या फवारणीतून मोठय़ा प्रमाणात विषबाधा होत असल्याचे प्रकार समोर आले. सव्वा वर्षांत ८५५ शेतऱ्यांना विषबाधा झाली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात विषबाधेचे संकट अधिक गडद झाले. गत नऊ महिन्यांत अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात विषबाधेचे १४० रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ३३ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. विषबाधेमुळे काही शेतकऱ्यांचे मृत्यूही झाले. कीटकनाशकाचा वापर शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे.

विषबाधा टाळण्यासाठी फवारणी तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. सध्या पश्चिम विदर्भात दमट, उष्ण व प्रखर उन्हाचा पारा अशा प्रकारचे वातावरण आहे. पिकांमधील सूक्ष्म वातावरण रसशोषक किडी व बोंड अळय़ांना पोषक आहे. त्यावर नियंत्रणासाठी सध्या ठेका पद्धतीने कीटकनाशकांची फवारणी करून घेण्याची पद्धत आहे.

काही शेतमजूर हंगामामध्ये सतत फवारणीचीच कामे असल्याने त्यांच्यावर जीवघेणा घातक परिणाम होतो. सततच्या कीटकनाशकाच्या संपर्कामुळे त्वचेची अ‍ॅलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात. दाटलेल्या पिकामध्ये फवारणी करताना द्रावण अंगावर, डोळ्यात व श्वासाद्वारे नाकामध्ये जाते. तसेच फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे, विडी ओढणे, हात न धुता पाणी पिणे आदी प्रकार सर्रास आढळून आले. अत्याधुनिक पंपाद्वारे प्रेशरने फवारणी होत असल्याने त्याचे अंश अंगावर येतात. कीटकनाशकाचे अंश सरळ पोटात गेल्याने प्रकृती अत्यवस्थ होऊन मृत्यूही ओढवण्याचे प्रकार घडले.

कीटकनाशकांची खरेदी, हाताळणी व फवारणीवर कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आवश्यक त्या प्रमाणात व दर्जेदार कीटकनाशके खरेदी करावे, तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये, कीटकनाशकाची मात्रा फवरणीसाठी मोजून घ्यावी, फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्क आदीचा वापर करावा, पंपाचे नोझलमधील कचरा तोंडाने फुंकून काढू नये, कीटकनाशकाचा शरीराशी सरळ संपर्क आल्यास पाण्याने स्वच्छ धुवावे, उन्हात फवारणी करू नये, तसेच वाऱ्याविरूद्ध दिशेने फवारणी करू नये आदी सूचना विद्यापीठाने केल्या आहेत. कीटकनाशकांची निवड करताना नुकसानीचा प्रकार, प्रादुर्भावाची तीव्रता, नुकसानीची पातळी, अवस्था आणि किडींच्या तोंडाची रचना आदी मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे. पाने, फुले, फळे खाणाऱ्या अळय़ा, रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी जमिनीतून द्याव्या लागणाऱ्या कीटकनाशकांचा वापर प्रभावी ठरतो.

कीटकनाशकांचे तीव्र विषारी, फार विषारी, साधारण विषारी आणि  किंचित विषारी या चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. किडीच्या प्रकारानुसार त्याची निवड गरजेची आहे. फवारणी करताना योग्य काळजी घेण्याच्या अभावाने विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पाहणीतून समोर आले.

पडताळणीविना फवारणी : पिकावरील किडीच्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेची पडताळणी न करताच किटकनाशकांची फवारणी केली जात असल्याचे कृषी विद्यापीठाच्या निदर्शनास आले. सर्वेक्षण केल्यावर किडीची आर्थिक नुकसान संकेत पातळी सरासरी १० रसशोषक किडी प्रति पान, तसेच बोंडअळय़ा पाच टक्के यांचे एकत्रित नुकसान असल्यास कीटकनाशकाचा वापर आवश्यक ठरतो, असा सल्ला कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून देण्यात आला.

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कपाशीची मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. दमट व उष्ण वातावरणामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. इतरही पिकांवर तीन ते चार प्रकारच्या अळय़ांचा प्रादुर्भाव आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकाचा वापर होतो. त्याच्या फवारणीतून विषबाधा होऊ नये, यासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे. शेतकऱ्यांनी फवारणी करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

– सुभाष नागरे, कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.