नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांचा जामीन अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
नक्षलवादी किंवा नक्षलवादी चळवळीचे समर्थक असल्याचा करण्यात येणारा आरोप चुकीचा असल्याचा युक्तिवाद साईबाबा यांच्याकडून न्यायालयात करण्यात आला. मात्र, तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला. जामीनासाठी साईबाबा यांच्या वकिलांनी शारीरिक व्याधींचे कारणही दिले होते. मात्र, ते सुद्धा न्यायालयाने ग्राह्य धरले नाही. कारागृहामध्ये साईबाबा यांना अतिरिक्त सुविधा आणि आवश्यक औषधे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. साईबाबा यांना मे महिन्यात गडचिरोली पोलीसांनी अटक केली होती. सध्या ते नागपूरमधील कारागृहात अटकेत आहेत.