अयोध्येत राम मंदिर बांधण्यास जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, नागपूर आणि बेंगळुरुत आयोजित करण्यात आलेल्या हुंकार रॅलीला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.

उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असतानाच विश्व हिंदू परिषदेने त्याच दिवशी अयोध्या, बेंगळुरु आणि नागपूर या तीन शहरांमध्ये एकाच वेळी हुंकार सभेचे आयोजन केले आहे. संघाने नागपूरमधील स्मृतीभवन परिसरापासून काही अंतरावरील हनुमाननगरातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ नोव्हेंबरला हुंकार सभा आयोजित केली आहे. या सभेला संघाचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी ऋतुंभरा देवी, शंकराचार्य, भाजपाचे नेते उपस्थित राहणार आहे.

या हुंकार सभेविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. हायकोर्टाने याचिका फेटाळल्याने हुंकार रॅलीचा मार्ग मोकळा झाला आहे.