कडेगावच्या तरुणाकडून एक लाख पुस्तकांचे वाटप

एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपण्याची चिन्हे नाहीत, पण तेथील मराठी भाषेचे जतन व्हावे, ती वाहती राहावी यासाठी कडेगाव तालुक्यातील एका तरुणाने या भागात एक आगळी वेगळी वाचक चळवळ रुजवली आहे. सीमाभागातील वाचनालयांना मराठी साहित्य भेटीच्या या योजनेतून त्यांनी आजवर एक लाख पुस्तकांचे वाटप केले आहे.

ही यशोगाथा आहे सुनील चव्हाण या तरुणाची. कडेगाव तालुक्यातील नेवरी गावच्या चव्हाण यांनी आजवर मराठीतील ख्यातनाम लेखकांची १ लाख पुस्तके सीमाभागात वाटून मराठी संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ने चव्हाण यांना वाचनाची आवड लागली. पुढे त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन आणि त्या जोडीने संग्रह केला. वाचनातून मराठी भाषेची तिच्या जतनाची प्रक्रिया होऊ शकते, असे जाणवताच त्यांनी हा प्रयोग सीमा भागात करण्याचे ठरवले. तिथे मराठी भाषेवर रोज होणाऱ्या अन्यायातून ती टिकावी यासाठी पुस्तक चळवळ उभी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या भागातील विविध गावांमध्ये असलेल्या वाचनालयांना जमेल तशी मराठी पुस्तके भेट देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. नामवंत लेखकांची मराठी पुस्तके महाराष्ट्रात सहज उपलब्ध होतात. पण सीमाभागातील जनतेची तशी मागणी असतानाही त्यांना हे साहित्य उपलब्ध होत नाहीत. त्यांची ही भूक लक्षात घेऊन त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. यासाठी त्यांनी अगोदर सीमावर्ती भागातील अनेक गावांना भेटी दिल्या. ज्या गावात वाचनालय होते तिथे त्यांची अवस्था पाहात त्यांना पुस्तकरुपाने योग्य ती मदत करायची तर ज्या गावात वाचनालयच नाही तिथे चार मराठी तरुण उभे करत त्यांच्या पुढाकारातून वाचनालय सुरू करायचे. आणि मग त्यायोगे मराठी वाचनाची आवड जोपासायची. या साऱ्यांसाठी हे फिरस्तीचे कष्ट तर होतेच पण पुस्तक वाटपासाठी पुन्हा पदरमोड होती. केवळ त्या सीमा भागातील मराठी जिवंत राहावी या साठी त्यांनी ही चळवळ उभी केली आणि आता पाहतापाहता तब्बल एक लाख पुस्तकांचे वाटप केले आहे. त्यांचा हा उपक्रम पाहून प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यापासून ते अनेक सामान्य लोकही त्यांच्या या उपक्रमात त्यांना मदत करू लागले आहेत. सुनील चव्हाण यांच्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.