पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्याहस्ते आज स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मकथेचं प्रकाशन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक वीरांची पावनभूमी असलेल्या महाराष्ट्राला वंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरूवात केली.

“डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वत:ला समर्पित केले. गरीब, शेतकरी यांचे जीवन जगणे अधिक सोपे केले. त्यांच्या दु:ख, अडचणी कमी केल्या. त्याच्या जीवनाची कथा महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात ऐकायला मिळेल” असे शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.

जाणून घ्या बाळासाहेब विखे पाटील यांची महती

“बाळासाहेब विखे पाटील यांनी नेहमीच सत्ता आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजाच्या भल्याचा प्रयत्न केला. राजकारणाच्या माध्यमातून समाजात बदल कसा घडवून आणता येईल, गाव आणि गरीबांच्या समस्या कशा सोडवता येतील, यावर त्यांनी नेहमी भर दिला. बाळासाहेब विखे पाटील यांच विचारांमुळे इतरांपासून ते वेगळे ठरतात” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“आजही त्यांचा प्रत्येक पक्षात सन्मान होतो. गाव, गरीबाच्या विकासाठी त्यांनी जे कार्य केले, ते पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल. बाळासाहेबांनी गरीबाचे दु:ख जवळून पाहिले, समजून घेतले व त्यांच्या भल्यासाठी काम केले” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“आज शेती आणि शेतकऱ्याला अन्नदाताच्या भूमिकेतून पुढे नेऊन, उद्योजक बनवण्यासाठी संधी निर्माण केली जात आहे. एमएसपी असो किंवा यूरिया नीम कोटिंग आज सरकार शेतकऱ्यांच्या छोटया-छोटया अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

“साखरेमध्ये जो चमत्कार महाराष्ट्रात झाला, गुजरातमध्ये दूध क्रांती झाली. गव्हाचे हरयाणा-पंजाबमध्ये विपुल उत्पादन झाले. हेच स्थानिक मॉडेल आज देशाला पुढे घेऊन जात आहे. शेती करताना नवीन आणि जुन्या पद्धतीचा मेळ घातला पाहिजे” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.