माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत नंदुरबार येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सकाळी दहा वाजता नंदुरबारचे पालकमंत्री पद्माकर वळवी यांच्या हस्ते, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
नंदुरबार शहरातील जुने पोलीस कवायत मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. नायक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कारविजेते अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील व महाराष्ट्र ग्रंथ परिषदेचे संस्थापक डॉ. पीतांबर सरोदे यांना गौरविण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बुधवारी दुपारी तीन वाजता ‘काव्य कुसुमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य वाहरू सोनवणे राहणार आहेत. या कार्यक्रमात अनेक कवींचा सहभाग राहणार आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. या कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती, अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, साहित्यिक अपर्णा वेलणकर व प्रा. प्रज्ञा दया पवार, डॉ. विश्वास पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. सातपुडय़ाच्या पर्वतराजीत होणाऱ्या या ग्रंथोत्सवाचा विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रणजितसिंह राजपूत यांनी केले आहे.