सोमवारी जिल्ह्यात शाळेची पहिली घंटा वाजणार असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले असले तरी गणवेशासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचबरोबर अकरावी प्रवेश प्रक्रियाही सोमवारपासून सुरू होत असून अतिरिक्त विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी आणखी २० तुकडय़ा मंजूर करण्याची तयारी शिक्षण विभागाने दर्शवली आहे.
जिल्ह्यातील बहुंताशी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके आणि स्वाध्यायपुस्तिका देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या २० लाख ७६ हजार २३० पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन स्वागत करीत असताना शाळांच्या प्रवेशदारावर रांगोळी घालून पुष्पमालांनी सजविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तके मिळाली पाहिजेत असे शासनाचे आदेश असताना यंदा मात्र गणवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण अद्याप गणवेशासाठी मिळणारे अनुदानच प्राप्त झालेले नसल्याने नवी पुस्तके जुन्या पोषाखावरच विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहेत.
तसेच उद्यापासून जिल्ह्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्ह्यात असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या जागांपेक्षा सुमारे तीन हजार विद्यार्थी अधिक असल्याने प्रवेशासाठी झुंबड उडण्याची शक्यता लक्षात घेऊन उच्च शिक्षण विभागाने यंदा अकरावीसाठी विनाअनुदानित तत्त्वावर जादा २० तुकडय़ांना मान्यता देण्याची तयारी दर्शवली आहे.