काँग्रेस व राष्ट्रवादीचे गोत्र एकच आहेत. स्वार्थासाठी त्यांनी वेगळी दुकाने काढली. हे लोक भ्रष्ट्राचारवादी आहेत. १५ वर्षांत त्यांनी काय दिले? मुख्यमंत्री बदलून काहींची स्वप्नपूर्ती केली; पण सामान्य माणसाचे एकही स्वप्न पूर्ण केले नाही, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे चढविला. परंतु २५ वर्षे युतीच्या माध्यमातून राज्यात राजकीय संसार केलेल्या शिवसेनेची अप्रत्यक्ष दखलही त्यांनी घेतली नाही. भाजपला बहुमत द्या, मी दिल्लीतून महाराष्ट्राची सेवा करतो, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. गोपीनाथ मुंडे यांची उणीव भासू देणार नाही. त्यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करू, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
राज्यातील भाजप महायुतीच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ अटलबिहारी मदानावर मोदी यांच्या उपस्थितीत झाला. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा व परळीतील उमेदवार पंकजा पालवे, लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतम खाडे यांच्यासह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. मोदी म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्याशी ३० वर्षांचा संबंध होता. गरीब, दुर्लक्षित व उपेक्षित समाजाचे कल्याण करणाऱ्या या नेत्याला केंद्रात ग्रामविकास खाते दिले होते. पण परमेश्वराला माझ्यापेक्षा मुंडे आवडल्याने ते आपल्यात नाहीत. मुंडे असते तर मला महाराष्ट्रात येण्याची गरज पडली नसती. पण आजही राज्यातील प्रत्येक तरुण मुंडे आहे. त्यांच्याच तपश्चय्रेचे फळ म्हणून लाखोंचा जनसमुदाय आला आहे. त्यामुळे राज्यातील प्रचाराचा प्रारंभ आपण येथून करीत आहोत. माझ्यावर विश्वास ठेवा, मुंडे यांची कमी भासू देणार नाही. त्यांचे रेल्वेसह विकासाचे स्वप्न पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रवादी व काँग्रेसवर तोफ डागताना मोदी म्हणाले की, दोन्ही पक्षांचे गोत्र एकच आहे. स्वार्थासाठी ते वेगळे झाले. हे लोक भ्रष्टाचारवादी आहेत. १५ वर्षांत ‘कोण बनेगा अरबपती’चा खेळ त्यांनी खेळला. मुख्यमंत्री बदलून काहींच्या अपेक्षा पूर्ण केल्या, पण सामान्य माणसाची एकही अपेक्षा पूर्ण झाली नाही. औरंगाबादच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत जपानच्या सहकार्याने उद्योग उभा राहणार आहे. चीनही औद्योगिक वसाहतीस मदत करीत आहे. दुष्काळामुळे पाणी नाही, त्यामुळे साडेतीन हजारांवर शेतकरी आत्महत्या करतात. हे चित्र बदलायचे आहे. महाराष्ट्राची तिजोरी खाली आहे. भ्रष्टाचार रोखला तरी राज्य उभे राहील, असा दावा करून देश हायफाय-वायफाय बरोबर स्वच्छताही मागतो आहे. त्यात योगदान देण्याचे आवाहन मोदींनी केले.
राज्यात २५ वर्षांची मत्री तुटलेल्या शिवसेनेबद्दल अप्रत्यक्ष उल्लेखही मोदींच्या भाषणात नव्हता. पंकजा मुंडे यांनी राज्याच्या प्रचाराचा प्रारंभ बीडमधून करून मोदींनी सन्मान वाढवला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आधार दिला. आपली लढाई पक्ष वा कोणा नेत्याशी नाही, तर नियतीशी आहे. सत्तेत गेलेल्या मुंडेंना नियतीने हिरावून नेले. ही सत्ता परत सामान्य माणसासाठी मिळवणे हे आपले ध्येय आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘महाराष्ट्र आज कोठे आहे?’
महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ. मात्र, आज महाराष्ट्र कोठे आहे? या राज्यात आर्थिक ताकद आहे, पण १५ वर्षांत सगळे ठप्प आहे. या दुर्दशेतून राज्याला वाचवण्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी भाजप मित्रपक्ष महायुतीला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहन मोदींनी केले. मी दिल्लीत असल्यामुळे महाराष्ट्रात विकासाची लाईन जोडा आणि चांगले कपडे घालून गुंडगिरी, दंगे घडवून सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण करणाऱ्यांना बाजूला करा, असे आवाहनही त्यांनी केले. विरोधक म्हणतात काही मोठे व्हिजन सांगा. परंतु मी छोटा माणूस असल्याने छोटय़ा-छोटय़ा लोकांसाठी मोठी कामे करण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजीमहाराजांनीही छोटय़ा-छोटय़ा लोकांना सोबत घेऊनच िहदवी स्वराज्य स्थापन केले, याची आठवणही त्यांनी करून दिली.