साताऱ्यात जकातवाडी येथे पिसाळलेला कुत्र्याने चावा घेतल्याने युवक-युवतीचा मृत्यू झाला. डबेवाडी येथील रुपाली बबन माने (वय २३) आणि जकातवाडी(ता सातारा) येथील देवानंद लोंढे (वय २५) असे या घटनेतील मृतांची नावे आहेत. मात्र, सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारले असून या कुत्र्याने आणखी ५ जणांचा चावा घेतला असल्याचे ग्रामस्थानी सांगितले आहे. सातारा शहराचा कचरा सोनगाव येथील कचरा डेपोत टाकण्यात येतो. यामुळे उघड्यावर असलेल्या कचऱ्यावरील अन्नाच्या शोधत आलेली भटकी कुत्री येथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. दुसरीकडे सातारा शहर परिसरातील कुत्र्यांचे सातारा नगर पलिकेच्या माध्यमातून निर्बीजिकरण करण्यात आले नसल्यामुळे अलिकडच्या काही दिवसांत कुत्र्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सदर बझार परिसरात देखील असलेल्या कत्तलखान्यामुळे येथे कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ७ ते ८ कुत्र्यांच्या टोळक्याने एका चिमुरडीला लक्ष करत तिच्यावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कालच कैद झाली होती.
काही वर्षांपूर्वी कल्याणी शाळेसमोर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला होता. मोकाट कुत्र्यांनी मुलाचे भर दिवसा शरीराचे लचके तोडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशाच प्रकारचे हल्ले साताऱ्यात होऊ लागल्याने कल्याणी शाळेसमोरील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सातारा नगरपालिका प्रशासनाने या प्रकरणात वेळेत लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2021 12:20 am